वाकड पोलिसांनी काढली रहाटणीतील सहा गुंडांची टक्कल करून धिंड
पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील वाहनांची तोडफोड करून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही गुंड सर्रास शहरात करताना दिसत आहेत .आर्यन मॅन म्हणून ओळखले जाणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश शहरात आल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडावर वचक बसेल असे वाटत होते. माञ शहरातील पिंपरीत एकाच वेळी शंभर गुंडाचा एका तरूणावर झालेला प्राणघातक खुनी हल्ला असो की चिंचवड काळेवाडी आकुर्डी याठिकाणी झालेल्या तोडफोडीच्या घटना असो. गुन्हा वाढत आहे पण कमी होत नाही यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे भितीचे वातावरण कमी करण्यासाठी वाकड पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील सहा आरोपींना अटक करून अक्षरशः शहरात त्यांचे टक्कल करून धिंड काढली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अधिक बोलण्यास टाळले आहे. घटनास्थळा वरील हत्यारे ताब्यात घेण्यासाठी आरोपींना घेऊन गेलो होतो अस सांगितले आहे.
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहाटणी येथे शनिवारी अज्ञात सहा जणांच्या टोळक्यासह दोन अल्पवयीन मुलांनी घराबाहेर बसलेल्या आकाश दत्तात्रय पवार यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता. मुख्य आरोपीने पूर्व वैमनस्यातून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत कोयत्याने वार केले. शिवाय त्यांच्या घरावर, दरवाजा, खिडकी दगड भिरकावले होते. या घटनेमुळे परिसरात अत्यंत भीतीचे वातावरण होते.
तसेच आरोपींनी दहशत पसरविण्याच्या उद्देशाने हुल्लडबाजी केली होती. त्यानंतर पोलिसांनी काही तासातच मुख्य आरोपी कवठेकरसह सर्वांना अटक केली. आज सहा आरोपींच टक्कल करून त्यांची धिंड काढली आहे. यावेळी सर्व नागरिक रस्त्यावरून नेणाऱ्या गुंडाना पाहात होते. पुढे आणि पाठीमागे पोलीस अधिकारी होते.