बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

वडीलोपार्जित घरांचे वाटपपत्र होणार पाचशे रुपयांच्या स्टँप पेपरवर

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील वडीलोपार्जित जमिनीवर बांधलेल्या घरांचे वाटपपत्र आता पाचशे रुपयांच्या स्टँप पेपरवर ग्राह्य धरले जाणार आहे. त्यानुसार मिळकतीच्या नोंदी होऊन मिळकत कर भरणे सोपे होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या नोंदी बंद केल्या होत्या त्यामुळे अनेकांचा कर थकीत दिसत होता. हि समस्या लक्षात घेऊन पाचशे रुपयांच्या स्टॅप पेपरवरील वाटणीपत्रानुसार मिळकत कराच्या नोंदी करून घेण्याचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी बुधवारी दिला आहे.

नव्याने वाटपपत्र करून नोंदी करताना सामायिक जागेचे मुल्यांकन जास्त असल्याने वाटपपत्रासाठी नागरीकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर तातडीने अंमलबजावणी करण्याची सूचना दिल्यानंतर महापालिकेने नव्याने परिपत्रक काढून नोंदी करून घेणार असल्याचे आदेश दिला आहे. कोणत्याही प्रश्ना संदर्भात नागरिकांची अडवणूक करू नका अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने हा निर्णय घेतला असल्याचे अजित गव्हाणे यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील बहुतेक स्थानिक नागरीक सामायिक गट नंबर असलेल्या जागेमध्ये घरे बांधतात. त्यामुळे बहुतांश खरेदी विक्री या प्रक्रियेशिवाय स्थानिकांच्या घरांची बांधकामे होतात. यापुर्वी अशा घरांच्या नोंदी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाकडे करण्यासाठी १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर वाटणीपत्र करुन नोंदी होत होत्या.

परंतु अलिकडच्या काळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत स्थानिक रहिवाशी यांच्या अशा नोंदी थांबविण्यात आल्या होत्या . घराची जागा अत्यंत कमी असुनसद्धी वाटपपत्राकरीता नागरीकांना संपुर्ण जागेची स्टैंप ड्युटी भरून वाटपपत्र करावे लागत होते . सामायिक जागेतील बांधकामाचे मुल्यांकन जास्त असल्याने वाटपपत्रासाठी नागरीकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असे . तसेच स्थानिक नागरीकांच्या अंतर्गत वादामुळे सर्वजन एकत्र येऊन वाटणीपत्रासाठी उपस्थित रहात नसल्याची वेगळीच अडचण होती.

परिणामी स्थानिक नागरीक मिळकत कराची नोंद होत नसल्याने कर भरु शकत नव्हते . त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून यामध्ये सुधारणा करण्याची आग्रही मागणी होती. प्रत्येक वेळी जादा स्टॅम्प ड्युटी भरावी लागत असे. आता 500 रुपये च्या स्टॅम्प ड्युटी वर सुद्धा नागरिकांना नोंदी करता येतील. हा प्रश्न काळेवाडी, चिखली, तळवडे, मोशी, भोसरी व पूर्वीच्या गावांमध्ये होता.नागरिकांची हि मागणी लक्षात घेऊन महापालिकेने आता 500 रुपयांच्या स्टॅप पेपरवरील वाटणीपत्रानुसार मिळकत कराच्या नोंदी करून घेण्याचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.

Share this: