खुशखबरः म्हाडातर्फे पिंपरी चिंचवडसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात
पिंपरी (वास्तव संघर्ष) : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर व सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 5 हजार 863 सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला असून 26 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज नोंदणी करता येणार असून घरांची सोडत १८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
अर्जासोबत रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला तसेच ज्या आरक्षण असणाऱ्या वर्गातून अर्ज करत आहे त्याचे प्रमाणपत्र असे पुरावे ऑनलाईन सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अर्जाची छाननी देखील ऑनलाईन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नोंदणी केलेल्या अर्जदारांना 27सप्टेंबर रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. ऑनलाईन अनामत रक्कमेची स्वीकृती 28 सप्टेंबरपर्यंत केली जाणार आहे. 29 सप्टेंबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस, एनइएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.