रूग्णाच्या सूपमध्ये निघाले रक्ताने माखलेले कापसाचे बोळे ; पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार
पुणे – येथील जहांगीर हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णाला देण्यात येणाऱ्या सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे सापडले आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांनी याचा व्हिडिओ काढून हा सर्व प्रकार उजेडात आणला आहे. हे सूप हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये बनवण्यात आले होते. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.जहांगीर रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाला सूप देण्यात आले होते. मात्र या सूपमध्ये रक्ताने माखलेले दोन कापसाचे बोळे सापडले. या प्रकारामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाला देण्यात येणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रीय दिलेली नाही.
हॉस्पिटलमध्ये असलेल्या रुग्णाला सूप देण्यात आले त्यावेळी सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे पाहिल्यानंतर रुग्णाला धक्का बसला. त्याने आपल्या नातेवाईकांना हा प्रकार सांगितल्यानंतर नातेवाईकांनी त्याचा व्हिडिओ तयार केला. नातेवाईकांनी या सर्व प्रकाराचा व्हिडिओ करून कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात असून याप्रकरणी पोलीस काय भूमिका घेतात हे पहावं लागेल