फेरीवाले व पथारी व्यावसायिकांवरील कारवाई थांबवावी अन्यथा आंदोलन करु
पिंपरी(वास्तव संघर्ष ) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने फेरीवाले व पथारी व्यावसायिकांवर सुरु केलेली कारवाई बेकायदेशीर असून ही कारवाई ताबडतोब थांबवावी. ज्या फेरीवाले व पथारी व्यावसायिकांकडे महानगरपालिकेचा परवाना आहे त्यांना संरक्षण मिळावे, सरकारी कामात अडथळा आणला म्हणून 353 चा गुन्हा दाखल करण्याची धमकी पोलिस व अतीक्रमण विभाग फेरीवाले व पथारी व्यावसायिकांना देत आहे हे ताबडतोब थांबवावे अशी मागणी पथारी व्यावसायिक पंचायत महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस बाळासाहेब मोरे यांनी शुक्रवारी (दि. 21 जून) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी पंचायतीचे सरचिटणीस बाळासाहेब मोरे, पिंपरी चिंचवड विभाग प्रमुख दामोदर मांजरे, पिंपळे सौदागर प्रमुख मारुती निंबाळकर, भोसरी विभाग प्रमुख संगीता शिंदे, गणेश देशमुख आदी उपस्थित होते.
सरचिटणीस बाळासाहेब मोरे म्हणाले की, वाहतूक सुरळीत करण्याच्या नावाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार यांनी मागील आठवड्यात अर्थसंकल्प बैठकीत आयुक्तांना आदेश दिले की, शहरातील फेरीवाले व पथारीवाल्यांवर कारवाई करावी. त्यानंतर आयुक्तांच्या आदेशाने प्रशासनाने शहरात फेरीवाले व पथारीवाल्यांवर बेकायदेशीरपणे कारवाई सुरु केली. यानंतर पथारी व्यावसायिक पंचायतीचे शिष्टमंडळ सरचिटणीस बाळासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार यांना भेटले. यावेळी त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले की, ज्यांच्याकडे महानगरपालिकेचा परवाना नाही अशा बेकायदेशीर व्यावसायिकांवर कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. यानंतर शिष्टमंडळ आयुक्त श्रावण हर्डीकर यांना भेटले आयुक्तांनी मात्र, या कारवाईबाबत परवाना धारक व विना परवाना धारक असे स्पष्ट आदेश नसल्याचे सांगितले. त्यामुळे प्रशासन सर्वांवरच कारवाई करीत आहे. ही कारवाई पुर्णता: बेकायदेशीर असून ज्या फेरीवाले व पथारीवाल्यांकडे मनपाचा परवाना आहे. त्यांना संरक्षण मिळालेच पाहिजे. ही पंचायतीची मुख्य मागणी आहे व ताबडतोब कारवाई थांबवावी असे सरचिटणीस बाळासाहेब मोरे यांनी सांगितले.
सरचिटणीस बाळासाहेब मोरे म्हणाले की, याबाबत निर्णय घेण्यासाठी पुढील बैठक गुरुवारी (दि. 27 जून) पिंपरी चिंचवड मनपा भवन येथे महापौर, पक्षनेते, आयुक्तांसह शिष्टमंडळाचे प्रतिनिधी यांच्या समवेत होणार आहे. 27 जूनच्या बैठकीत योग्य निर्णय झाला नाही तर पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व फेरीवाले व पथारीवाले रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील. असाही इशारा सरचिटणीस बाळासाहेब मोरे यांनी दिला.
परवाना धारक फेरीवाले व पथारीवाले व्यावसायिकांवर होणारी ही अन्यायकारक, बेकायदेशीर कारवाई म्हणजे “दुखणं डोक्याला आणि इलाज गुडघ्याला” असा प्रकार आहे. परवाना धारक फेरीवाले व पथारीवाले व्यावसायिकांबाबत केंद्र व राज्य सरकारने शहर फेरीवाला कायदा केला आहे. त्यात पुनर्वसनाचे स्पष्ट धोरण आखले आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी. पुनर्वसनाचा आराखडा जाहिर केल्याशिवाय कारवाई करु नये, सुरु असलेली एकतर्फी कारवाई त्वरीत थांबवावी. अगोदर पुनर्वसन मगच कारवाई, परवाना धारक व विना परवाना धारक पाहुनच निर्णय घ्यावा आणि पोलिस व अतीक्रमण विभागाची दादागिरी बंद झाली पाहिजे. अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा सरचिटणीस बाळासाहेब मोरे यांनी दिला.