पिंपरी चिंचवड :पवना धरणाचे सहा दरवाजे उघडले ;नदीकाठच्या लोकांना महापौरांचा सतर्कतेचे आवाहन
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणाचे सहा दरवाजे आज उघडण्यात आले आहेत..त्यामुळे २२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु झाला आहे. गेल्या शुक्रवारी धरणात केवळ ५० टक्के पाणीसाठा होता..मात्र या आठवड्यात मुसळधार पाऊस कोसळल्यानं पवना धरण तुडुंब भरले आहे. पवना नदीकाठच्या लोकांना महापौर आणि आयुक्तांनी सतर्कतेचे आवाहन केले आहे.
प्रसिद्धिपत्रकाद्वारे म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना ,इंद्रायणी व मुळा नदीच्या पात्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे वाढ होत असून नदीकाठी असणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन महापौर राहूल जाधव व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
गेल्या काहीदिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पवना ,मुळा व इंद्रायणी नदीपात्र दुथडी भरुन वाहत आहे.पवना धरणातून विसर्ग सुरू आहे.येत्या काळात आणखी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाबरोबरच आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पूरनियंत्रण कक्ष कार्यान्वित आहे.संभाव्य पूराचा धोका लक्षात घेता नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.पूरसदृष्य स्थिती निर्माण झाल्यास अग्निशामक दलाशी 9922501475 या क्रमांकावर संपर्क साधावा.(वास्तव संघर्ष)