आरपीआय शहराध्यक्षपदी सुरेश निकाळजे यांची निवड ;रामदास आठवले यांनी पिंपरीत केली घोषणा..!
पिंपरी (वास्तव संघर्ष) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) आठवले गटाच्या शहराध्यक्षपदी निवडीवरून पिंपरी-चिंचवड शहरात वादाला तोंड फुटले होते. अखेर पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पदी सुरेश शांताराम निकाळजे यांची दस्तुरखुद्द केंद्रिय सामाजिक न्याय मंञी रामदास आठवले यांनी निवड केली आहे. एका कार्यक्रमानिमित्त आठवले पिंपरी-चिंचवड शहरात आले असताना ही निवड जाहीर करण्यात आली. या निवडीला माजी नगरसेवक आणि माजी शहराध्यक्षांनी विरोध दर्शविला होता माञ रामदास आठवले यांनी या निवडीला ग्रीन सिग्नल दिल्याने विरोध मावळलेला दिसून आला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पिंपरी मतदार संघ आरपीआयला सुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने शहराध्यक्ष पदाची सूत्रे कोणाला मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदासाठी सुरेश निकाळजे यांची वर्णी लागल्याने आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आरपीआय कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात आलेल्या भिमसृष्टीचे उदघाटन व माता रमाई पुतळयाच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाला.