माझ्याकडे विकासाचा ‘आराखडा’ ; पिंपरी मतदारसंघातून विधानसभा स्वबळावर लढणार-शेखर ओव्हाळ
दिपक साबळे पिंपरी (वास्तव संघर्ष ) – नगरसेवक असताना तसेच नसतानाही प्रभागात विकासकामे केलीत. कारण माझा मूळ पिंड सामाजिक कार्यकर्त्याचा असून मी जनसेवेसाठी सदैव कटीबद्ध राहीन. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून गेल्या अनेक महिन्यांपासून सामाजिक कार्य करीत असल्यामुळे नागरिकांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी स्वबळावर विधानसभेची निवडणूक लढवणार आहे , अशी माहिती माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी दिली.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींवर चर्चा केली. ‘मी तिकिटासाठी तीव्र इच्छुक होतो. या प्रक्रियेत आता मी खूप पुढे गेलोय. मला ही निवडणूक लढायचीच आहे. मतदार आणि कार्यकर्ते माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे मी लढणार आणि विजयही मिळवून दाखवणार’, असा विश्वास ओव्हाळ यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदार म्हणून ओव्हाळ यांनी गेल्या काही दिवसांपासून पिंपरी मतदारसंघ पिंजून काढला. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पक्ष आणि कार्यकर्त्यांचे जाळे विणले. पक्षातील वरिष्ठांशी बोलूनच तयारी केली. जेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तिकीट घ्यायला कुणी इच्छुक नव्हते, तेव्हा आपण तिकिटांची मागणी केली. मात्र, आपल्याला तिकिटासाठी डावलले गेले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पिंपरी मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक समस्या प्रलंबित आहेत. सध्याचे लोकप्रतिनिधी विकासकामे करण्यात अपयशी ठरले आहेत. ज्यांना मतदारसंघाच्या चतुःसीमा देखील माहीत नाहीत, त्यांना उमेदवारी मिळाली आहे. विधानसभेतील प्रतिनिधी महापालिकेतील कामांचा गवगवा करीत आहेत, राज्यशासनाच्या संदर्भातील एकही काम करीत नाहीत, हे दुर्दैव आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी डावलल्यानंतर आत्तापर्यंत विविध पक्षांकडून उमेदवारी घेण्यासाठी फोन येताहेत. मात्र, मी आता अपक्ष म्हणूनच लढणार आहे. राष्ट्रवादी तसेच अन्य पक्षांचे कार्यकर्तेही आपल्यासोबत आहेत. उद्या दि. 4 रोजी अर्ज भरणार आहे, असेही ओव्हाळ यांनी सांगितले.