बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीची उमेदवारी राष्ट्रवादी कांग्रेसला होणार डोकेदुखी ;अपक्ष उमेदवार शेखर ओव्हाळांना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा पाठिंबा

 

दिपक साबळे.. पिंपरी(वास्तव संघर्ष) –  पिंपरी विधासभा मतदार संंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डोकेदुखी ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकीकडे राष्ट्रवादीचा एबी फॉर्म सुलक्षणा शिलवंत धर यांनाा देत दुसरीीकडे आण्णा बनसोडे यांना देेखील एबी फॉर्म देत उमेदवारी नक्की कोणाला हा प्रश्न निर्माण केला.

त्यामुळे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून इच्छुक असलेले शेखर ओव्हाळ यांनी अपक्ष उमेदवार म्हणून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ढोल- ताशांच्या गजरात उमेदवारी अर्ज आज भरला. निवडणूक निर्णय अधिकारी  यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज जमा केला. ओव्हाळ यांना राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, जावेद शेख, रोहित अप्पा काटे यांनी पाठिंबा दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी शेखर ओव्हाळ यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केल्यामुळे अन्य उमेदवारांना धडकी भरली. 

या रॅलीमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह महाराष्ट्र राज्याचे आरपीआय उद्योगसेलचे अध्यक्ष अमित मेश्राम, छायाताई कोतवाड, संदीप ढेरंगे, नीलेश अल्हाट यांच्यासह कार्यकर्ते या वेळी मोठ्या संखेने उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी ‘शेखर ओव्हाळ आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘एकच भाऊ, शेखरभाऊ’ अशा घोषणा दिल्या. ठिकठिकाणी महिलांनी ओव्हाळ यांचे औक्षण केले. ढोल-ताशांच्या गजरात काढलेल्या या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शुक्रवारी (दि. 4) शेवट मुदत होती. त्यामुळे सकाळपासूनच पिंपरी विधानसभा मतदार संघात जल्लोषाचे वातावरण होते. राष्ट्रवादीकडून प्रबळ दावेदार मानल्या गेलेल्या शेखर ओव्हाळ यांना उमेदवारीबाबत डावलण्यात आल्यामुळे ते दुखावले गेले होते. मात्र, पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचाच हे ध्येय असल्यामुळे अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवायची, असा निर्धार शेखर ओव्हाळ यांनी केला. कार्यकर्त्यांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी शेखर ओव्हाळ यांना पूर्ण पाठिंबा दिल्यामुळेच माघार न घेता स्वबळावर ही निवडणूक लढवायची असा त्यांनी निश्चय केला आणि त्यानुसार शुक्रवारी मोठे शक्तिप्रदर्शन करीत ओव्हाळ यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. 

Share this: