पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण समितीच्या बूट खरेदीत गोलमाल..!

पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण समितीच्या बूट खरेदीत गोलमाल..!

पिंपरी-: चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. त्यानूसार महापालिकेने शिक्षण समितीकडून विद्यार्थ्यांना बूट खरेदीसाठी ठेकेदाराकडून संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मचार विकास महामंडळाला वर्डआर्डर दिली होती. मात्र, महामंडळाकडून बूट खरेदी न करता वेगळ्या अन्य कंपन्याचे बूट घेवून त्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांवर वरिष्ठ अधिका-यांकडून दबाव टाकून ठेकेदारांकडून बूट घेण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे महामंडळ बूट तयार नाही, तरीही त्यांना वर्कआर्डर देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना वेगळ्याच कंपन्यांचे बूट वाटप करीत लाखो रुपयाचा घोटाळा झाला आहे, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 120 प्राथमिक शाळा आहेत. इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात सुमारे 37 हजार 664 विद्यार्थी संख्या आहे. विद्यार्थ्यांना पालिकेतर्फे प्रत्येक शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी शासनाच्या नियमानुसार शैक्षणिक साहित्य दिले जाते. मात्र, महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वेळेत मिळत नसल्याची शोकांतिका आहे. आजपर्यंत शिक्षण मंडळाच्या ठेकेदारांनी साहित्य खरेदीत गौडबंगाल करून पैसे लाटण्याचा उद्योग यापुर्वीही झालेला आहे. यामुळे शिक्षण मंडळ बरखास्त होवून शिक्षण समितीची स्थापना झाली. त्यातही अनेक उद्योग सुरु आहेत.

विद्यार्थ्यांना बुट, सॉक्‍स, रेनकोट, दोन गणवेश, पीटी गणवेश, दप्तर, स्वेटर, कंपासपेटी, फुटपट्टी, नकाशा वही, प्रयोग वही, चार आणि दोन रेघी बारा वह्यांचा संच प्रत्येक वर्षी दिला जातो. त्यासाठी शिक्षण समितीतर्फे कोट्यवधी रुपये खर्चाची निविदा प्रसिध्द केली जाते. शाळेच्या पटसंख्येनुसार वस्तुंची खरेदी केली जाते. मात्र, शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांपेक्षा अधीक विद्यार्थ्यांची नावे दाखवून वस्तू खरेदी केल्याचे प्रकार यापुर्वी घडले आहेत. खर्चाचा सोयीस्कररित्या कागदोपत्री उल्लेख करून तपशील सादर केला जातो. परंतु, पटसंख्येवरील शंभर टक्के विद्यार्थी हे शाळेत उपस्थित नसतात. अशांची देखील नावे यादीला लावून गरज नसताना वाढीव साहित्य खरेदीची बिले सादर केली जातात.

साहित्य खरेदी करताना मूळ कंपनीच्या (ब्रॅण्डेड) वस्तुला फाटा देऊन दुय्यम दर्जाचे साहित्य खरेदी केले जाते, अशी प्रकरणे उघडकीस आल्याने पाठीमागे शिक्षण मंडळ आणि ठेकेदार यांच्यात टोकाचे वाद झाले आहेत. त्यावेळी शिक्षण विभागातील प्रशासन देखील तोंडघशी पडले होते. त्याचे स्पष्टीकरण शिक्षण मंडळासह ठेकेदारांना द्यावे लागले होते.

दरम्यान, महापालिकेच्या शिक्षण समितीने नव्याने निविदा न काढता, जून्याच दराने विविध साहित्य खरेदी पुर्वीच्याच ठेकेदाराकडून केलेली आहे. त्या ठेकेदारांसोबत एक वर्षाचा करारनामा करुन त्याना वर्कआर्डर देवून ही खरेदी झालेली आहे. त्यात बूट खरेदीसाठी ठेकेदाराने चर्मकार महामंडळाच्या नावावर काम घेवून तशी वर्कआर्डर घेतली. पण महामंडळ बूट तयार करीत नाही. तरीही त्या महामंडळाला कशी काय ? बूट खरेदीची आदेश देण्यात आले. तसेच त्या ठेकेदाराने वेगवेगळ्या कंपन्याचे बूट खरेदी विद्यार्थ्यांना वाटप केले आहे. त्यामुळे खरेदी आदेश एकाला आणि खरेदी दुस-याकडूनच असा प्रकार शिक्षण समितीकडून समोर आला आहे.

वरिष्ठ अधिकारी ठेकेदारांच्या पाठिशी

महापालिकेच्या विद्यार्थ्यांना बूट खरेदीचे आदेश चर्मकार महामंडळाला दिले. पण बूट खरेदी वेगळ्याच कंपनीकडून करण्यात आले. ते बूट घेण्यासाठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांवर दबाव टाकण्यात आले. तसेच तुम्ही माल घ्यायचा आणि गुपचूप सही करायची, असा सज्जड दमच घातला आहे. त्यामुळे पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापक वरिष्ठ अधिका-यांच्या दबावापोटी हे बूट घेवू लागले आहे. मुळात महामंडळाचे बूट नसतानाही वेगळ्याच कंपन्याचे बूटाचे वाटप शाळांमध्ये सुरु असल्याने शिक्षण समितीत पारदर्शक कारभाराच्या धिंडवडे निघू लागले आहेत

Share this: