नाशिकचा 12 वर्षाचा बालगिर्यारोहक निघाला आफ्रिकेतील सर्वोच्च किलीमांजारो शिखरावर
आरव मंत्री- शिवलाल मंत्री होणार किलीमांजारो सोबत सर करणारे पहिले बापलेक
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव
नाशिक (प्रतिनिधी): येथील अशोका युनिव्हर्सल स्कुल मध्ये सातवी मध्ये शिकणारा आरव मंत्री आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलिमांजारो सर करण्यासाठी रवाना झाला असून त्याचे वडील शिवलाल मंत्रीही हे त्याच्यासोबत या शिखरावर चढाई करणार आहेत. देशातील पहिली बापलेक जोडी या निमित्ताने सोबत शिखर सर करणार आहे. 360 एक्सप्लोररच्या वतीने आयोजित मोहिमेचा फ्लॅग ऑफ टांझानिया येथे अल्फान्सो, शिवलाल मंत्री व एव्हरेस्टवीर व विश्वविक्रमवीर आनंद बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला.
आफ्रिकेतील टांझानिया देशातील हे शिखर असून याची उंची समुद्र सपाटी पासून 19,341फूट आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी 15 ऑगस्ट 2015 रोजी हे शिखर सर करून त्यावर भारताचे राष्ट्रगीत वाजवून विश्वविक्रम केला होता.
आंतरराष्ट्रीय स्केटर ते आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक
आरव मंत्री हा लहानपणापासूनच स्केटिंग चे धडे गिरवत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर बेल्जियम येथेही स्केटिंग खेळासाठी भारताचे प्रतिनिधित्व त्याने केले होते. याच वर्षी एप्रिल मध्ये एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे सोबत एव्हरेस्ट बेसकॅम्प ट्रेकही पूर्ण केला आहे. 2018 मधेही केदारकंठा व जानेवारी 2019 मध्ये संदकफु हे हिमालयन ट्रेकही त्याने पूर्ण केले आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर किलीमांजारो सर करून नाशिक तसेच भारताचा विक्रमवीर बनण्यासाठी पुढील काही दिवस तो चढाई करणार आहे.
360 एक्सप्लोरर मार्फत लवकरच ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखराची मोहीम आयोजित केली जाणार आहे याशिवाय सिडनी येथे स्काय डायव्हिंग ही केले जाणार आहे. इच्छुकांनी संपर्क करण्याचे आवाहन एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी केले आहे.
आनंद बनसोडे –
“नाशिकमधील प्रथम बालगिर्यारोहक म्हणून आरव मंत्री चे काम अभिमानास्पद आहे. त्यांचे स्वप्नावरील प्रेम व जिद्द याची तोड कशाशीही करता येणार नाही. तो किलीमांजारो सर करून सर्व मुलांपुढे एक आदर्श निर्माण करेल यात शंका नाही. 360 एक्सप्लोरर मार्फत अनेकांना जागतिक मोहिमांसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.”
-शिवलाल मंत्री-
आरव लहानपणापासूनच खूप एनर्जी असलेला आहे. नवनवीन गोष्टी करणे हा त्याचा छंद आहे. आरव च्या यशाबद्दल आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो आहे. नाशिक मधून 7 खंडातील मोहिमा करण्याचा आमचा मानस आहे. जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखराच्या मोहिमेसाठी तो जाणार आहे.