पिंपरी मनपाने महात्मा फुलेंच्या नामफलकात दुरुस्ती करा:अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
पिंपरी (वास्तव संघर्ष ) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांना थोर समाजक्रांतीकारक महात्मा जोतीराव फुले यांचे नाव देण्यात आले आहे. पिंपरीतील कामगार भवन शेजारी महात्मा फुलेंचे भव्य स्मारक महानगरपालिकेने उभारले आहे. यशवंत नगर येथील लांडेवाडी – निगडी रस्त्यावरील चौकालाही महात्मा जोतीराव फुले असे नाव देण्यात आले आहे. या सर्व ठिकाणी मनपाच्या वतीने लावण्यात आलेले फलक ‘महात्मा ज्योतीबा फुले’ असे आहेत. ते बदलण्यात येऊन ‘थोर समाजक्रांतीकारक महात्मा जोतीराव फुले’ असे लावावेत अशी मागणी अनेक दिवसांपासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने व फुले, शाहू, आंबेडकर प्रेमींनी मनपा प्रशासनाकडे केली आहे. या विषयाचे स्मरणपत्र शनिवारी (दि. 16 नोव्हेंबर) अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने शहराध्यक्ष ॲड. चंद्रशेखर भुजबळ यांनी पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांना दिले आहे.
यावेळी ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष आनंदा कुदळे, वंचित बहुजन आघाडीचे सुरेश गायकवाड, समता परिषदेचे शहर सरचिटणीस व कामगार नेते राजेंद्र नाना करपे, ईश्वर कुदळे, लहु अनारसे आदी उपस्थित होते.
28 नोव्हेंबर रोजी महात्मा जोतीराव फुले यांचा स्मृतीदिन असतो. त्यांना अभिवादन करण्यासाठी फुले प्रेमी पिंपरीतील महात्मा फुले स्मारकावर बहुसंख्येने जमतात. 28 नोव्हेंबर पुर्वी महानगरपालिकेने महात्मा फुले यांच्या नावाने असणा-या सर्व प्रकल्पांचे फलक ‘थोर समाजक्रांतीकारक महात्मा जोतीराव फुले’ असे दुरुस्त करुन लावावेत व मनपाच्या सर्व कामकाजात, दफ्तरात सुधारीत नोंद करावी अन्यथा फुले – शाहु – आंबेडकर प्रेमी तीव्र आंदोलन करतील असा इशारा या पत्रात देण्यात आला आहे.
महात्मा फुले यांचे नाव व सही ‘जोतीराव गोविंदराव फुले’ असे आहे. शासनाने प्रकाशित केलेल्या “महात्मा फुले समग्र वाड:मय” या ग्रंथात देखील सर्वत्र आणि महात्मा फुले यांच्या स्व:हस्ताक्षरातील ‘उईल पत्रावर’ ” जोतीराव गोविंदराव फुले” असाच उल्लेख आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या आणि महात्मा फुले यांची कर्मभूमी असणा-या पुण्याचा महानगरपालिकेतील सर्व दफ्तरी नोंदीत देखील ‘जोतीराव’ असाच उल्लेख आहे. याबाबतचा महात्मा फुले यांची सही असणारा दस्तावेज सोबत जोडला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समितीचे सचिव आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासन केंद्राचे प्रमुख ज्येष्ठ संशोधक प्रा. हरी नरके यांनी या बाबत वेळोवेळी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करुन ‘जोतीराव गोविंदराव फुले’ अशी नोंद करुन घेतली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेही आपल्या सर्व दफ्तरात व नाम फलकांवर ‘थोर समाजक्रांतीकारक महात्मा जोतीराव फुले’ अशी दुरुस्ती करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करु असा ईशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने पत्रकात देण्यात आला आहे.