दापोडीत झालेल्या दुर्घटनेस जबाबदार असणा-या ठेकेदार व मनपाच्या अधिका-यांवर कडक कारवाई करा – नाना काटे
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड येथील दापोडी याठिकाणी रविवारी सांयकाळी फुगेवाडी येथील मनपाच्या मलनिस्सारण वाहिनीच्या कामाच्या ठिकाणी तब्बल २५ फूट खोल खड्यात मजुरांसह त्यांना वाचविण्यासाठी गेलेले अग्निशामक दलाचे जवान मातीच्या ढिगा-याखाली गाडले गेले त्यामध्ये एका मजुराचा व अग्निशामक दलातील एका जवानाचा गुदमरुन मृत्यू झाला. हे दोन्ही मृत्यू मनपाच्या संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे व मनपाच्या वरीष्ठ अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळे झालेले आहेत.
या कामाच्या ठिकाणी ठेकेदाराने कुठल्याही प्रकारचे सुरक्षा व्यवस्था केलेली नव्हती. कामगारांना सुरक्षा साधने दिलेली नव्हती. त्यामुळे कामगाराचा नाहक बळी गेलेला आहे. व मनपाचा अग्रिशामक दलाचा जवान शहिद झालेला आहे.असे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
काटे या निवेदनात म्हणतात की, सदरची घटना अतिशय गंभीर आहे. या घटनेत केवळ ठेकेदारांच्या व मनपाच्या अधिका-यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे नाहक दोन बळी गेलेले आहेत. त्यामुळे आपणांस विनंती आहे की, या कामाचे ठेकेदार मे. एम.बी. पाटील व मनपाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे, उपअभियंता रामेश्वर मोहाडीकर, कनिष्ठ अभियंता रमेश जिंतीकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच संबंधित ठेकेदाराची सखोल चौकशी करुन त्याला कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकण्यात यावेत अशी मागणीही यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.