बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी पिंपरी चिंचवड शहरात केली जात आहे हजारो झाडांची कत्तल

पिंपरी : मुंबईत राञीचा गैरफायदा घेत आरे जंगलातील हजारो झाडांची कत्तल विकासाच्या नावाखाली केली . यावर तेथील नागरिकांनी तसेच वृक्षप्रेमीनी आंदोलन देखील केले. या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार करत आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. असाच प्रकार पिंपरी चिंचवड येथील चिखली याठिकाणी गायरानावरील नियोजित १०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी अंदाजे एक हजार ५२७ झाडे काढण्याची पूर्वतयारी महापालिकेने केली असून, त्याच्या कामाला गुरुवारी (५ डिसेंबर) रोजी सुरुवात झाली.

मात्र जीपीएस तंत्रज्ञानाच्या आधारे तेथे प्रत्यक्षामध्ये सुमारे साडेतीन हजार झाडांची मोजणी करण्यात आली आहे. जादा झाडांची मोजणी कशासाठी केली, याबाबत उद्यान विभागाने मौन बाळगले असून, प्रकल्पासाठी कमीत कमी झाडे काढण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. झाडांच्या पुनर्रोपणाचे पालिकेकडे नियोजन नसल्याचे दिसून येत आहे

हा प्रकल्प वेळेपूर्वीच मार्गी लागावा यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. त्यासाठी दोन टप्प्यांत तेथील झाडांची मोजणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यात प्रत्यक्षात प्रकल्पाच्या जागेवरील झाडे आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जागेवरील झाडांचा समावेश करण्यात आला आहे. ठेकेदाराकडील सहा मदतनिसांच्या साह्याने तेथील झाडांची पुनर्तपासणी आणि मोजणी करण्याचे काम तेथे दिवसभर सुरू होते. प्रत्येक झाडाला क्रमांक देण्यात आला असून त्याआधारे त्याची प्रजाती आणि गुगल ऍपद्वारे त्याचे अक्षांश-रेखांश निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यानुसार तेथील झाडांची संख्या साडेतीन हजारांहून अधिक झाली आहे. त्याबाबतचा अहवाल लवकरच ठेकेदाराकडून महापालिकेला सादर केला जाणार आहे.

उद्यान विभागाने दिलेल्या माहितीनुसार एक हजार ५२६ झाडे काढण्यात येणार असून त्यापैकी २२७ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. मात्र, जादा झाडांची मोजणी कशासाठी झाली, यावर विभागाने मौन बाळगले आहे. प्रकल्पाच्या जागेवर गिरिपुष्प, सुबाभूळची सर्वाधिक झाडे आहेत. निलगिरी, साग, चिंच, कडुनिंब, खैर, पळस, सीताफळ, खिरणी अशी २० प्रजातींची झाडे आहेत.

Share this: