महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी डोळ्यात तेल घालून काम करावे-नरेंद्र मोदी
पुणे:- येथील पाषाण रस्त्यावरील ‘आयसर’(भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था) संस्थेच्या आवारात ‘देशांतर्गत सुरक्षा’ या विषयावरील या तीन दिवसीय परिषदेचा समारोप करण्यात आला. समारोप सत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मोदी म्हणाले महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी डोळ्यात तेल घालून काम करावे. महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांनी प्रभावीपणे काम केले पाहिजे.
महिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा करता कामा नये, अशा सूचनाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या समारोपप्रसंगी देशभरातील पोलीस महासंचालकांना दिल्या. पोलिसांवरील कामाचा ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत काम करताना पोलिसांनी समाजातील शेवटचा घटक विचारात ठेवून कर्तव्य पार पाडावे, असेही ते म्हणाले.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी आणि नित्यानंद राय उपस्थित होते. या परिषदेत देशभरातील १८० पोलीस महासंचालक सहभागी झाले होते.