कोरोना व्हायरस : पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीला औषध निर्मितीसाठी परवानगी द्या
पिंपरी (वास्तव संघर्ष) – भारतातसह जगात कोरोना या साथीच्या आजारांने थैमान घातले आहे . या आजाराचा ज्या गतीने फैलाव सुरू आहे तो रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागु करण्यात आले आहे . या जीवघेण्या आजारापासुन बचावासाठी अधिक वैद्यकीय मनुष्यबळ व पुरेश्या औषधांची गरज आहे . त्यामुळे पिंपरी येथील हिंदुस्थान अॅन्टीबायोटिक्स या कंपनीला औषध निर्मितीसाठी परवानगी द्यावी , अशी मागणी नगरसेविका गीता मंचरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे .
भारत जगाला ‘ हाड्रोऑक्सिक्लोरोक्वीन ‘ या औषधाचा पुरवठा करत आहे . पिंपरी येथील ‘ एचए ‘ कंपनीत या औषधाची निर्मिती होऊ शकते . येथे सर्व यंत्रणा सज्ज असल्यामुळे त्वरित उत्पादनाला सुरुवात केली जाऊ शकते , असे मंचरकर यांनी या पत्रात म्हटले आहे . जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफ यांच्या सहकार्याने 1954 साली सुरू झालेल्या या कंपनीत सुरवातीला ‘ पेनिसिलीन ‘ ची निर्मिती होत असल्याने ‘ एचसीक्यु ‘ चे उत्पादन सहज शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे .
एचए कंपनीपासून रस्ता व रेल्वे मार्ग जवळ असल्याने वाहतूकीसाठी अडचण निर्माण होणार नाही . कंपनीची औषध उत्पादनाची क्षमता मोठी असल्यामुळे देशातील मागणीचा योग्य पुरवठा केला जाऊ शकतो . पण काही अपरिहार्य कारणांमुळे हा प्लांट उत्पादन थांबवून बंद करण्यात आला . गरिबांना स्वस्तात औषध उपलब्ध व्हावी , या महात्मा गांधी यांच्या विचारातून स्थापन झालेल्या या कंपनीचा या आणिबाणीच्या परिस्थितीत यथायोग्य उपयोग होऊ शकतो . त्यामुळे सरकारने पिंपरी येथील ‘ एचए ‘ कंपनीला औषध निर्मितीसाठी परवानगी द्यावी , अशी मागणी मंचरकर यांनी केली आहे .