पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिकांना माल पुरवठा करणा-या दुकानदारांना उद्यापासून परवानगी
पिंपरी(वास्तव संघर्ष) :-पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम व्यावसायिकांना माल पुरवठा करणारी स्टील,सिमेंट,पत्रे, टाईल्स व दारं खिडक्या विक्रीच्या दुकानांना व जीवनावश्यक वस्तुच्या व्यतिरिक्त सामानाची होलसेल(ठोक) विक्रेत्यांच्या दुकानांना परवानगी देण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या वतीने घेतला असून येत्या सोमवार दि ११ मे २०२० पासून या बाबतचे अर्ज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कोरोना कोवीड १९ च्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत.
त्यानुसार संबंधितांनी परवानगीसाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयानुसार अर्ज करावेत असे आवाहन महापौर ऊषा उर्फ माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. क्षेत्रीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दुकानांच्या परवानगीबाबत निर्णय घेण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज दिले आहेत.
बिल्डिंग साहित्य पुरवठा करणारी दुकाने व जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त सामानाच्या ठोक विक्रेत्यांच्या दुकानांना परवानगी देण्यात येईल.
बिल्डिंग साहित्य पुरवठा करणारी दुकाने व जीवनावश्यक वस्तुच्या ठोक विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रामध्ये दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू राहण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतर दुकानांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.त्यानुसार बांधकाम साहित्य व जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त सामानाची ठोक विक्रेत्यांच्या दुकानांना परवानगी देण्यात येईल.
निवडणूकीच्या ३२ प्रभागानुसार एका प्रभागातील गावानुसार/नगरानुसार ५०० मीटरचे अंतरावर एक ठोक विक्रेत्याचे तसेच बांधकाम साहित्याचे दुकान चालू करता येईल.
गठीत केलेली समिती निवडणूकीच्या प्रत्येक प्रभागाची रचना विचारात घेवून प्रत्येक मुख्य रस्ता /चौक वरील दुकानांना रोटेशनप्रमाणे आलेल्या अर्जांची छाननी करून परवानगी देईल.
एकाच भागांत अनेक अर्ज आल्यास दुकान चालू करणे करीता दिवस नेमून देण्यात येईल.
त्यासाठी खालील अटी व शर्तीनुसार परवानगी देण्यात येणार आहे.
ग्राहकांना माल खरेदीला येताना मास्क वापरणे बंधनकारक आहे.
ग्राहकास दुकानातील वस्तूना हात लावू न देणे ही विक्रेत्याची जबाबदारी आहे.
विक्रेत्याने ग्राहकांना प्रवेश देताना सॅमिटायझरचा वापर,मास्क चा वापर व दोन ग्राहकांमधील अंतर एक मीटर पेक्षा जास्त राहील याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
५५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना व पाच वर्षा पेक्षा कमी वयाच्या मुलांना दुकानात प्रवेश वर्जित असणार आहे.
माल खरेदीला आल्यानंतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा दंडनीय गुन्हा आहे.
माल खरेदीला आल्यानंतर सदर परिसरांत गुटखा खाण्यास अथवा गुटखा खावून थुंकण्यास मनाई असून या अटींचा भंग झाल्यास संबंधित दुकानदारावर कारवाई करून संबंधित परवानगी रद्द करण्यात येईल असेही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.