पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचा ढाण्या वाघ गेला , ‘दत्ताकाका’ यांचं निधन
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचा ढाण्या वाघ नगरसेवक दत्ताकाका साने यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. दत्ताकाका साने यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांच्यावर चिंचवड येथील खाजगी हास्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांचा स्वाब दिनांक २२ जून २०२० घेण्यात आला होता.तर सकारात्मक अहवाल २४ जून २०२० रोजी प्राप्त झाला होता.त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांना न्यूमोनिया,उच्च रक्तदाब,आधीचा आजार व मधुमेह असल्याने त्यांवर उपचार सुरू होते.आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राण ज्योत मालवली . साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय काका साने वय ४८ वर्षे यांचे आज कोरोनामुळे निधन झाले .लाॅकडाऊन कालावधीत नागरिकांची सेवा करताना त्यांना लागण झाली होती.त्यांच्या निधनामुळे तीव्र दुःख झाल्याची भावना महापौर उषा ऊर्फ माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केली.शहराच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतांना महापौर माई ढोरे म्हणाल्या श्री साने यांनी नागरिकांच्या हितासाठी अनेक विषय महापालिकेच्या सभागृहात मांडले.
दत्ताकाका हे पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या काळातही स्वखर्चाने गोरगरिबांना अन्न धान्य देत होते. गरिबांचा नगरसेवक अशी त्यांची ओळख होती. ते चिखलीतून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते.तसेच दत्ताकाका या नावाने चिखलीसह अख्ख्या पिंपरी चिंचवड शहरात ते प्रसिद्ध होते. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे राष्ट्रवादीत मोठी शोककळा पसरली आहे.
दरम्यान, दत्ताकाका साने यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी हर्षदा, 19 वर्षीय मुलगा आणि 16 वर्षीय मुलगी तर दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. दत्ताकाका यांच्या अशा जाण्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.