बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड आणि पुण्याला जोडणारी पिएमपिएल बस आजपासून सुरू

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील 190 मार्गांवर बस धावणारी आणि या दोन शहराला जोडणारी पिएमपिएल बस आजपासून सुरू करण्यात आली आहे. सध्या बसच्या तिकीटात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 5 महिन्यांपासून बंद असलेली पीएमपीएमएलची सेवा आजपासून शहरातील सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.

स्वारगेट, पुणे मनपा, शिवाजीनगर, हडपसर, पुणे स्टेशन, हडपसरसारख्या गर्दीच्या मार्गावर सकाळी आणि सायंकाळी शटल सेवा दिली जाणार आहे. त्यासाठी 120 जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी दोनशे बस आधीपासूनच मार्गावर धावत होत्या. उर्वरित दोनशे, अडीचशे बसचा ताफा सेवेसाठी तयार करण्यात आला आहे.

बसमध्ये एकावेळी 17 प्रवाशांना प्रवासाची परवानगी असेल. आठ महिला व नऊ पुरुषांचा समावेश असेल, अशी माहिती पिएमपिएल प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. गणेशोत्सवात गर्दी होऊ नये, यासाठी बस सेवा सुरू करण्याचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला होता.

65 वर्षांपुढील ज्येष्ठ आणि 10 वर्षाच्या आतील मुलांना बसमध्ये प्रवेश नाही. मास्क लावूनच बसावे, बसमध्ये कॉइन बॉक्स ठेवण्यात आला आहे. दरम्यान, रोजंदारी सेवकांना आता काम मिळणार आहे. गेल्या 5 महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना काम नव्हते. त्यांना वेतन मिळत नसल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ आली होती.जवळपास 200 कर्मचाऱ्यांना आता रोजगार मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी दिली

Share this: