देहूरोड पोलिसांनी केली खूनाची उकल ;पती झोपेत असताना पत्नीनेच केला खून
देहूरोड (वास्तव संघर्ष) प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा खून केल्याची घटना देहूरोड येथे उघडकीस आली आहे. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास मामुर्डी देहूरोड येथे ही घटना घडली आहे. पती झोपेत असताना पत्नीने त्याचा खून केला आणि शेजारच्या लहान मुलांसोबत सायकलिंगसाठी निघून गेली. सायकलिंग करून आल्यानंतर ‘अज्ञातांनी तिच्या पतीचा खून केल्या’चा बनाव पत्नीने केला होता . मात्र पोलीस खाक्या दाखवताच आरोपी पत्नीने खून केल्याची कबुली दिली. आणि पोलिसांनी खुनाची उकल केली.
मयूर गोविंद गायकवाड (वय – 28) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे.
रितू मयूर गायकवाड (वय 20, रा. भैरोबामंदिराच्या मागे, मामुर्डी, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपी पत्नीचे नाव आहे.
याबाबत ओमकार गोविंद गायकवाड (वय 25) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद फिली आहे.
सविस्तर वृत्त असे की, आरोपी रितू हिला तिचा पती मयत मयूर याच्याकडून लैंगिक छळ होत होता. याबाबत तिने तिच्या सासरच्या लोकांना आणि आई वडिलांना सांगितले होते. मात्र तिचे कोणी एकूणच घेत नव्हते या त्रासातून सुटका होत नसल्याने तिने मयूरला संपवण्याचा कट रचला . त्यानंतर तीने मागील चार दिवसांपासून शेजारी राहणारी एक महिला आणि लहान मुलांसोबत मॉर्निंगवॉकला जाणे चालू केले.
नवरा घरात एकटा असल्याची ती संधी शोधत होती. सोमवारी (दि. 28) रात्री तिच्या सासूला रात्रपाळी होती. तिची सासू एका रुग्णालयात काम करते. दिर सोमवारी रात्री घरी येणार नव्हता. सोमवारी रात्री 11 वाजता पती मयूर दारू पिऊन घरी आला. जेवण करून पती झोपला. त्यानंतर आरोपी रितू रात्रभर मयूरला मारण्याचा विचार करत होती.
नेहमीप्रमाणे मंगळवारी पहाटे ती शेजारची महिला आणि लहान मुलांसोबत मॉर्निंगवॉकला गेली. तिकडून आल्यानंतर घरात मयूर झोपला असताना तिने मयूरच्या डोक्यात फावड्याने मारले. नंतर गळ्यावर फावड्याच्या पुढच्या भागाने वार करून मयूरचा खून केला.आणि पुन्हा सायकलिंग करण्यासाठी ती बाहेर गेली.
सायकलिंग करून सकाळी सव्वासात वाजता घरी आल्यानंतर तिने बनाव केला की, ती घरी नसताना अज्ञातांनी मयूरचा खून केला.’ मोठमोठ्याने आरडाओरडा करून शेजा-यांना गोळा केले. शेजारी जमा झाल्यावर तिने चक्क बेशुद्ध पडल्याचे देखील नाटक केले. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच तीने खुनाची कबुली दिली . पोलिसांनी तिला अटक केली आहे.
दरम्यान, मयत मयूरचा भाऊ ओमकार याने दिलेल्या फिर्यादीत आरोपी रितू ही लग्नानंतर देखील गैरवर्तन करत होती. त्यातूनच तिने तिच्या अज्ञात साथीदारासोबत मिळून हा खून केल्याचे म्हटले आहे.