क्राईम बातम्याबातम्या

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी केली राहत्या घरातून अटक

मुंबई :-रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी घरात शिरून अटक केली आहे. बीबीसी मराठीला वरिष्ठ पोलीस सूत्रांनी माहिती दिली की ‘अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी अटक केली. त्यांना आता रायगडला नेण्यात येत आहे.’ आज दुपारी त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. अर्णब गोस्वामी यांच्याघरी रायगड पोलीस सकाळीच पोहचले आणि त्यांनी अर्णब यांना अटक केली. पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेताना धक्काबुक्की केली असं अर्णब गोस्वामींने एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.

5 मे 2018 रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली. तिथेच त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता. अन्वय नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरलं होतं. त्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नीनं अलिबाग पोलीस ठाण्यात अर्णब गोस्वामी यांच्यासह स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांचा आहे. रायगडमधील अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही कुठलीच कारवाई होत नसल्याने, नंतर 5 मे 2020 रोजी म्हणजे अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला दोन वर्षं झाल्यानंतर अक्षता नाईक यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला आणि न्यायाची मागणी केली.

त्यावेळी काँग्रेससह विविध पक्षांनी हा मुद्दा उचलला आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाईची मागणी केली.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या व्हीडिओची आणि अक्षता नाईक यांच्या तक्रारीची दखल घेत, 26 मे 2020 रोजी सांगितलं की, “आज्ञा नाईक (अन्वय नाईक आणि अक्षता नाईक यांची मुलगी) यांनी अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिकनं पैसे थकवल्यानं वडील आणि आजीनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची रायगड पोलीस तपास करत नाहीत अशी तक्रार केली. त्यानंतर मी सीआयडीला या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

Share this: