बातम्या

पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला . यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . प्रारंभी , भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आयुक्त हर्डीकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले . यानंतर संविधानाच्या प्रास्तविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले . यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील , आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ . के अनिल रॉय , सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे , कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे , समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले , सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे , माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते .

भारताचे एक सार्वभौम , समाजवादी , धर्मनिरपेक्ष , लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक , आर्थिक व राजनैतिक न्याय प्राप्त करून देण्याचा निर्धार करण्यात आला . तसेच विचार , अभिव्यक्ती , विश्वास , श्रध्दा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य तसेच दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करण्यात आला . भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत : प्रत अर्पण करीत असल्याची कृतज्ञ भावना व्यक्त करून आपल्या देशाप्रती एकनिष्ठ राहून देशाला प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर ठेवण्याचा सामुहिक संकल्प देखील यावेळी करण्यात आला .

दरम्यान , पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आयुक्त हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले . तसेच या पुतळ्याच्या प्रांगणातील भारतीय संविधानाच्या प्रास्तविकेच्या कोनशिलेस देखील पुष्पहार अर्पण करण्यात आला . यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील , सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे , सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त सुभाष माछरे , शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ . किशोर खिलारे आदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभाग प्रफुल्ल पुराणिक यांनी केले .

Share this: