पिंपरीतील पोलीस शिपाई महिलेचे तरुणासोबत अनैतिक संबंध;तरुणाला मागितली किडनीची खंडणी
पिंपरी (वास्तव संघर्ष) :– पिंपरीतील पोलीस शिपाई महिलेने तरुणासोबत अनैतिक संबंध ठेवले . त्यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारातील पैसे देण्याचे आमिष दाखवून पिंपरीतील पोलीस शिपाई महिलेने पुण्यातील पोलीस शिपाई नातेवाईक , तिची आई आणि अन्य चार जणांसोबत मिळून तरुणाचे अपहरण केले . इंदापूर जवळील जंगलात नेऊन त्याला मारहाण केली .
तरुणाचे आणि पोलीस शिपाई महिलेचे फोटो आणि व्हिडीओचा पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणाचा मोबाईल फोडून टाकला . त्यात भरीस भर म्हणजे आरोपींनी तरुणाला चक्क दहा लाख रुपये अथवा किडनीची खंडणी मागितली . हा प्रकार 5 डिसेंबर रोजी भर दिवसा घडला .
महिला पोलीस शिपाई मनीषा साळवे , पोलीस शिपाई विजय कुमार साळवे , नंदकुमार कांबळे , आक्की लोंढे , सनी लोंढे , विनय लोंढे , मनीषा साळवेची आई अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत . सूरज असगर चौधरी ( वय 21 , रा.ओटास्कीम , निगडी ) असे अपहरण , मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे . त्याने याबाबत शुक्रवारी ( दि . 11 ) मध्यरात्री वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी महिला पोलीस शिपाई मनीषा साळवे ही पिंपरी वाहतूक शाखेत कार्यरत आहे . तर आरोपी विजय साळवे हा पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे नेमणुकीस आहे . आरोपी मनीषा हिचे आणि फिर्यादी सूरजचे अनैतिक संबंध होते . मनीषा हिने सूरजकडून काही पैसे घेतले होते . ते पैसे देण्यासाठी आरोपीने सूरजला 5 डिसेंबर रोजी थेरगाव येथील रॉयल कोर्ट सोसायटी समोर बोलावून घेतले . सूरज 5 डिसेंबर रोजी सकाळी सव्वादहा वाजता बोलावलेल्या ठिकाणी गेला . त्यानंतर आरोपींनी सूरजला एका गाडीत जबरदस्तीने बसवून इंदापूरजवळ असलेल्या जंगलात नेले .
तिथे आरोपींनी सूरजला लाकडी दांडक्याने , कोयत्याने मारहाण केली . दरम्यान आरोपींनी सूरजचा मोबाईल फोन घेतला . मनीषा हिने सूरजसोबत असलेले फोटो आणि व्हिडिओ नष्ट करण्याच्या उद्देशाने सूरजचा मोबाईल फोन फोडून फेकून दिला . त्यानंतर आरोपींनी सूरजकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितली . दहा लाख रुपये दे नाहीतर तुझी किडनी दे , अशी मागणी करीत धमकी दिली . हा प्रकार 5 डिसेंबर रोजी सकाळी सव्वादहा ते दुपारी तीन या कालावधीत घडला . याबाबत आठवडाभरानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . वाकड पोलीस तपास करीत आहेत .