खुशखबर! पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम कामगारांना मिळणार नव्वद दिवस काम केल्याबाबतचे पत्र
पिंपरी (वास्तव संघर्ष) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी होण्यासाठी आवश्यक असलेले नव्वद दिवस काम केल्याबाबतचे प्रमाणपत्र कामगारांना महापालिकेकडून दिले जाणार आहे . यामुळे मंडळाकडून मिळणारे लाभ कामगाराला मिळणे शक्य होणार आहे . महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत बांधकाम कामगार सेनेने समाधान व्यक्त करीत आभार मानले आहेत .
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नाक्यावरील बांधकाम कामगारांना नव्वद दिवस काम केल्याबाबतचे पत्र उपलब्ध होण्यासाठी बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पत्रव्यवहार या केला होता . त्यानुसार कामगारांना हे प्रमाणपत्र देण्यासाठी स्थापत्य , विद्युत , पाणीपुरवठा , जलनिस्सारण बांधकाम परवानगी विभागातील कार्यकारी अभियंता यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे .
येथून मिळणाऱ्या प्रमाणपत्राच्या आधारावर कल्याणकारी मंडळात नोंदणी केल्यास संबंधित कामगाराला विमा , वैद्यकीय सुविधा , मुलांच्या शिक्षणासाठी सवलती आदी लाभ मिळणे शक्य होणार आहे . आयुक्तांनी कामगार हिताचा निर्णय घेतल्याने बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे यांनी त्यांचे आभार मानले आहेत .