आरोग्यक्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरातील ‘खासगी प्रयोगशाळेत ‘आरटीपीसीआर’ चाचणी करताना नागरिकांची लूट’

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करताना नागरिकांची लूट केली जात आहे. या माध्यमातून शासनाच्या नियमांना ठेंगा दाखविला जात असल्याचा आरोप करत लूट करणाऱ्या प्रयोगशाळांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात कदम यांनी म्हटले आहे की, शहरातील खासगी प्रयोगशाळेकडून रूग्णांची लूट सुरू आहे. महापालिका प्रशासन मात्र निद्रावस्थेत आहे. खासगी प्रयोगशाळेत कोरोनाची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करताना नागरिकांची लूट होऊ नये म्हणून शासनाने विशिष्ट दर निश्चित केले आहेत.

परंतु, शासनाच्या या नियमांना ठेंगा दाखवत पिंपरी-चिंचवड शहरातील काही खासगी प्रयोगशाळा लवकर कोरोनाचा अहवाल हवा असलेल्या नागरिकांकडून दुपटीहून अधिक म्हणजे 1500 रुपये उकळत आहेत. या गंभीर विषयाकडे महापालिकेचे मात्र दुर्लक्ष आहे.

महापालिका व शासनाच्या इतर तपासणी केंद्रांवर गर्दी वाढत आहे. शासकीय प्रयोगशाळेवर ताण वाढल्याने दोन-दोन दिवस अहवाल मिळत नाही. या विलंबामुळे खासगी प्रयोगशाळेत चाचणी करणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.

दरम्यान, शासनाने 30 मार्चपर्यंत खासगी प्रयोगशाळेत आरटीपीसीआर चाचणीसाठी 700 रुपये, रुग्णालयातील केंद्रात 850 रुपये तर घरून नमुने देणाऱ्यांसाठी 980 रुपये शुल्क निश्चित केले होते. हे शुल्क 31 मार्चला आणखी कमी करून 500 रुपये, रुग्णालयातील केंद्रात नमुने दिल्यास 600 रुपये, घरून नमुने दिल्यास 800 रुपये निश्चित केले.

शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच खासगी प्रयोगशाळांनी आरटीपीसीआर चाचणीचे शुल्क घ्यायला हवे. मध्यंतरी महापालिकेने काही प्रयोगशाळेंवर कारवाईही केली होती. या गंभीर प्रकरणाची चौकशी करून दोषी असणऱ्या प्रयोगशाळांवर कारवाई करण्यात यावी , अशी मागणी त्यांनी केली आहे.

आरटी-पीसीआर चाचणी शासन दरानुसारच बंधनकारक

भारतीय आयुर्विज्ञान संस्था आणि एनएबीएल मान्यताप्राप्त खाजगी प्रयोगशाळांकडून कोरोनासाठी असलेल्या आरटी-पीसीआर तपासणीचे दर निश्चित केले आहेत. मात्र काही प्रयोगशाळा जास्त दर आकारत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत या पार्श्वभूमीवर महापालीका वैद्यकीय विभागाने सर्व खासगी प्रयोगशाळांना पत्र पाठवून तंबी दिली आहे. शहरातील मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांनी पिंपरी चिंचवडमधील रूग्णांकडून शासन निर्णानुसारच आकारणी करावी, असे बंधनकारक आहे खासगी प्रयोगशाळांना अधिक दर आकारता येणार नाहीत. तक्रारी आल्यास साथरोग अधिनियम, १९८७ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे यांनी दिला आहे.

Share this: