रमाई भीमराव आंबेडकर स्मारकाच्या भूमीपूजनसाठी लाक्षणिक धरणे आंदोलन
पिंपरी (वास्तव संघर्ष): भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमुर्ती, माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकासाठी पिंपरी येथील भीमसृष्टीला लागून असलेली जागेवर येत्या 7 फेब्रुवारी 2023 रोजी भूमीपूजन व्हावे या मागणीसाठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमुर्ती माता रमाई स्मारक समिती पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने आज शुक्रवारी (दि.3) रोजी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन घेण्यात आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई भीमराव आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा पिंपरी येथे उभारण्यात येणार आहे. या पुतळा स्मारकासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 2017 ते 2022 या कालखंडात भाजपची एकहाती सत्त्ता असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महापालिकेचे तत्कालीन आयुक्त, महापौर, पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड शहरातील फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील सर्व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली होती.
मात्र त्यानंतर देखील भीमसृष्टीला लागून असलेल्या जागेवर आजतागायत भूमीपूजन करण्यात आले नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील तमाम आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलन करून यशस्वी केले.