बातम्यामहाराष्ट्र

लहान मुलांची शाळेची वेळ सकाळी 9 नंतर करा ; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी (वास्तव संघर्ष): लहान मुलांची शाळेची वेळ सकाळी 8:30 किंवा 9 नंतरच हवी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड. सचिन गोडांबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शालेय शिक्षण सचिव व शिक्षण संचालक यांच्याकडे केली आहे.

निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, असंख्य पालकांचे म्हणणे आहे की सकाळी इतक्या लवकर (7 ते 7:30 पर्यंत) लहान मुलांची शाळेची वेळ अतिशय चुकीची आहे व 8:30 किंवा 9 ही योग्य वेळ आहे म्हणजे त्याच्या थोडा वेळ आधी मुलांना शाळेत सोडता येईल व बसने किंवा लांबून येणारी मुले सकाळी 8 दरम्यान सर्व आवरून, नाश्ता करून घरातून बाहेर पडू शकतील. सध्या थंडीचे काही महिने असल्यामुळे हि इतक्या लवकर शाळेत जायला अनेक मुले नकार देतात. काही महिलांना जॉबला लवकर जायचे असल्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व सरकारी ऑफिस सकाळी 10 नंतरच सुरु करावीत.

अनेकदा मुलांना उठायला उशीर झाल्यामुळे मग काही पालक मारून, बळजबरीने त्यांना उठवतात. अनेकदा मुले झोप पूर्ण न झाल्यामुळे इतक्या लवकर शाळेत जाण्यास नकार देऊन दांडी मारतात. अनेकदा सकाळी उपाशी किंवा प्रात:विधी न उरकताच शाळेत पाठविली जातात इ. असंख्य कारणे बहुतेक घरांत सापडतील बहुतेक घरांत मुलांची झोपेची वेळ ही रात्री 11 च्या दरम्यान असते त्यामुळे सकाळी 5-6 दरम्यान त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध, त्यांच्या नैसर्गिक झोपेच्या अधिकाराविरुद्ध उठवून शाळेत पाठविणे हा मुलांवर अन्यायच नाही तर एकप्रकारे छळच आहे.

निवेदनात सचिन गोडांबे यांनी पुढे म्हंटले आहे की देशातील कोणतेही सरकारी वा खासगी ऑफिस सकाळी 7 किंवा 7:30 ला सुरु होत नाही. देशातील कोणतेही न्यायालय सकाळी 7 किंवा 7:30 ला सुरु होत नाही. मग देशातील लहान मुलांच्या शाळा का सकाळी 7 किंवा 7:30 ला सुरु करतात असा सवाल सचिन गोडांबे यांनी केला आहे. शिवाय ज्या शाळांना दोन शिफ्ट मध्ये वर्ग घेणे शक्य आहे त्यांनी सकाळी 8:30 नंतर 5 वी. च्या पुढील मुलांची व दुपारच्या शिफ्ट मध्ये लहान मुलांची शाळा घेतल्यास आणखी चांगले राहिल.

सुप्रीम कोर्टाने काही वर्षांपूर्वी झोपेचा अधिकार (Right to Sleep) हा जगण्याच्या मूलभूत अधिकारामध्ये (Right to Life) मध्ये समाविष्ट केला आहे. सकाळी 7 किंवा 7:30 ला शाळा सुरु केल्यामुळे जवळ राहणाऱ्या मुलांना त्याच्या किमान 30-40 मिनिटे आधी व लांबून किंवा बसने येणाऱ्या मुलांना त्याच्या किमान 1 तास आधी उठावे लागते. या मुलांना टिफिन बनवून देण्यासाठी त्यांच्या आईला अजून लवकर उठावे लागते. अनेक महिला नोकरी करत असल्यामुळे त्यांना स्वतः चा + मुलांचा + इतरांचा टिफिन बनवण्यासाठी अजून लवकर उठावे लागते. अनेकदा उशीर झाल्यामुळे मुलांना टिफिन मध्ये मॅगी, स्नॅक्स इ. चुकीचं खाद्य दिले जाते. तसेच मुलांचे पूर्ण न आवरता तसेच शाळेत पाठवले जाते. त्यामुळे सर्व सरकारी यंत्रणांना विनंती आहे की त्यांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा तसेच त्यांच्या व पालकांच्या आरोग्याचा व इतर गैरसोयीचा विचार करून देशभरातील शाळा सकाळी 9 नंतरच सुरु होतील असे आदेश तातडीने काढावेत व जनतेला दिलासा द्यावा हि मागणी सचिन गोडांबे यांनी केली आहे.

Share this: