आरोग्यबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

अखेर भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेल्या ‘स्पर्श’ हाॅस्पिटलने गाशा गुंडाळला ;पिंपरी चिंचवड पालिकेने घेतला ताबा

पिंपरी (वास्तव संघर्ष) चिंचवडमधील ऑटो क्‍लस्टर येथील कोविड सेंटर चालविणाऱ्या स्पर्श संस्थेत मोफत बेडसाठी रूग्णांकडून एक लाख रुपये लाटणाऱ्या तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार कऱणाऱ्या स्पर्श हेल्थकेअर संस्थेला महापालिकेने मोठा दणका दिला. पोलिसा आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी भ्रष्ट्र, अनागोंदी कारभार करणाऱ्या स्पर्श संस्थेवर तात्काळ कठोर कारवाई करा, अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा गर्भीत इशारा शनिवारी देताच आज (रविवारी) स्पर्श कडून सर्व काम काढून घेण्यात आले आणि त्यांचा ठेकाही रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे .

महापालिकेने स्पर्श व्यवस्थापन समाधानकारक काम करु शकलेले नाही, कामात हेळसांड केली असा ठपका ठेवला आणि ताबडतोब काम काढून घेतले. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यावरच स्पर्शला पाठिशी घातले असल्याचा थेट आरोप सुरू झाल्याने त्यांच्या गळ्यापर्यंत आल्याने त्यांनी अखेर स्पर्शचा कार्यक्रम केला. स्पर्श च्या कर्मचाऱ्यांचा रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजारात सहभाग हे गुन्हेगारी कृत्यात सहभाग असल्याचे स्पष्ट दर्शविते, ते मानवतेला काळीमा फासणारे आणि व्यवस्थापनाचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट करते, असाही ठपका महापालिकेने ठेवला आहे.

स्पर्श च्या डॉक्टरांनी चार रुग्णांकडून बेडसाठी पैसे घेतल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. याप्रकरणातील अटक केलेल्या चार डॉक्‍टरांकडून तीन लाख 70 हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली. स्पर्श या संस्थेने गैरव्यवहार तसेच भ्रष्टाचार केल्याचे दिसून आल्याने या संस्थेच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होईल, असा इशारा पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी महापालिका आयुक्‍तांना पाठविलेल्या पत्रात दिला होता.

नेमके काय आहे प्रकरण?

चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये महापालिकेचे कोविड हॉस्पिटल सुरू असून फॉर्म्युन स्पर्श हेल्थ केअर ही खासगी संस्था त्याचे संचलन करत होती.या हॉस्पिटलचा सर्व खर्च महापालिका करत आहे . मोफत उपचार होत असलेल्या या हॉस्पिटलमध्ये महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिकेला आयसीयू बेड देण्यासाठी खासगी हॉस्पिटलच्या मदतीने ‘ स्पर्श’च्या सल्लागाराने एक लाख रुपये घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला . यावर सर्वसाधारण सभेत घमासान चर्चा झाली होती . याप्रकरणी स्पर्शचे डॉ . प्रवीण जाधव , वाल्हेकरवाडी येथील पद्मजा हॉस्पिटलचे डॉ.शशांक राळे आणि डॉ . सचिन कसबे आणि एका महिला डॉक्टरला अटक करण्यात आली आहे .

स्पर्शकडून दहा दिवसांत काम काढून घेण्याचा आदेश महापौरांनी महापालिका प्रशासनला दिला होता . स्पर्श संस्थेवर कारवाई करावी अन्यथा जनतेच्या मनात असंतोष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल , असा पोलीस आयुक्तांनी इशारा दिल्यानंतर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी अखेर फॉर्म्युन स्पर्श हेल्थ केअर या खासगी संस्थेवर कारवाई केली आहे . त्यांची सेवा महापालिकेने अधिग्रहित केली आहे .

Share this: