क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या तिघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. मेडिकल दुकानदारासह अन्य दोघांना रेमडेसिवीर इंजेक्शन अधिक किमतीने विकण्यासाठी देत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे . ही कारवाई रविवारी ( दि . 9 ) करण्यात आली आहे .

शशिकांत रघुनाथ पांचाळ ( वय 34 , रा.जयमल्हार नगर , दत्तकॉलनी , थेरगाव ) , कृष्णा रामराव पाटील ( वय 22 , रा . 16 नंबर बस स्टॉप , थेरगाव ) , निखील केशव नेहरकर ( वय 19 , रा . बिजलीनगर चिंचवड ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत .

याबाबत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पञकार परिषद घेत माहीती दिली ते म्हणाले, आरोपी शशिकांत याचे चिंचवड येथे आयुश्री मेडीकल आहे . आरोपी कृष्णा एका रुग्णालयात नर्सिंग स्टाफ आहे . तर आरोपी निखिल हा डिलिव्हरी बॉय आहे . शशिकांत याच्या सांगण्यावरून कृष्णा आणि निखिल हे दोघेजण गरजू रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीने विकत होते . दोन इंजेक्शनची डिलिव्हरी घेऊन रविवारी पहाटे पावणेतीन वाजता हे दोघेजण दोन दुचाकीवरून जात होते . काळेवाडी फाटा येथे सुरू असलेल्या नाकाबंदीमध्ये दोघेजण अडकले . पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे दोन रेमडेसिवीर इंजेक्शन मिळून आले .

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या विक्री परवाना बाबत त्यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा औषध विक्रीचा परवाना नसल्याचे सांगितले . त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली . त्यात ते मेडिकल चालक शशिकांत पांचाळ याच्या सांगण्यावरून ते इंजेक्शन विकण्यासाठी जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले . यापूर्वी देखील दोघांनी अशा प्रकारे इंजेक्शन विकून पांचाळ याला पैसे आणून दिल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले . त्यानुसार पोलिसांनी शशिकांत पांचाळ याला ताब्यात घेतले . त्याच्या कारची ( एम एच 14 / डी ए 4881 ) झडती घेतली असता सीटच्या खाली 19 रेमडेसीवीर इंजेक्शन पोलिसांना मिळाली . पोलिसांनी एकूण 21 रेमडेसीवीर इंजेक्शन जप्त केली आहे .

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ . विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अवधुत शिंगारे , पोलीस अंमलदार दत्तप्रसाद चौधरी , जितेंद्र उगले , अतिश जाधव , होमगार्ड निखील सपकाळ , होमगार्ड रोहन गुंड यांच्या पथकाने केली .

Share this: