स्थायी समितीच्या अध्यक्षपदी संतोष लोंढे यांची बिनविरोध निवड
पिंपरी(वास्तव संघर्ष ) – पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी आज शुक्रवार (दि.६) रोजी निवडणूक पार पडली. अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपच्या संतोष लोंढे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंकज भालेकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतू अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी पंकज भालेकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत ही निवडणूक बिनविरोध केली आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी संतोष लोंढे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार आज स्थायी समिती सभागृहात दुपारी १२ वाजता अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी कामकाज पाहिले.
महापालिकेच्या स्थायी समितीत १६ सदस्य असतात. भाजपचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेना १ आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. अपक्ष सदस्य भाजपसोबत आहेत. भाजपचे स्थायीत बहुमत असल्याने भाजपचा अध्यक्ष होणार हे स्पष्ट होते. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सोमवारी (दि.२) अर्ज दाखल करण्यात आले. सत्ताधारी भाजपकडून संतोष लोंढे आणि राष्ट्रवादीचे पंकज भालेकर यांनी अर्ज दाखल केले होते. स्थायीत भाजपचे बहुमत असल्यामुळे संतोष लोंढे यांची निवड निश्चित मानली जात होती. त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता शिल्लक होती.
निवडणूक कार्यक्रम सुरू होताच पहिल्या पंधरा मिनिटांच्या काळात राष्ट्रवादीने माघार घेतली. पंकज भालेकर यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. निवड झाल्यानंतर पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी लोंढे यांचा सत्कार केला. यावेळी महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, विरोधी पक्षनेते नाना काटे, राष्ट्रलादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, भिमा फुगे, सुवर्णा बुर्डे, अभिषेक बारणे, शशिकांत कदम, आदी उपस्थित होते.