चॉंद बाबर कुटुंबाच्या जीविताला धोका,स्थानीक पोलीस तक्रार घेत नसल्याने आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे लेखी तक्रार
वाकड (वास्तव संघर्ष) : वाकड येथील आदर्श कॉलनी या ठिकाणी आशा कलाटे मारहाण प्रकरणी वेगळे वळण लागले आहे.आशा कलाटे यांच्या सासूबाई भागुबाई कलाटे यांनी चाँद बाबर यांना कायदेशीर जागा विकत दिली होती.तरीदेखील आशा दिलीप कलाटे या बळजबरीने त्या जागेवर ताबा मारण्याचा प्रयत्न करत असून चाँद बाबर यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही रविवारी(दि. 13) रोजी दुपारी तीन वाजता मारहाण करण्यात आली आहे. मात्र वाकड पोलीसांनी आशा कलाटे व त्यांच्या पतीवर अद्याप गुन्हा दाखल केला नाही.त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बाबर यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
या तक्रारीत बाबर यांनी म्हटले आहे की, माझ्या खरेदी जागेवर बळजबरीने ताबा घेण्याचा सतत प्रयत्न करणा-या व वारंवार मला व माझ्या कुटुंबाला सतत मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच मी रहात असलेल्या सर्वे नंबर 177/1/2 मध्ये दीड गुंठा जागा मी भागुबाई सोपान कलाटे यांच्याकडून नोव्हेंबर 2009 मध्ये खरेदी केली आहे. तेव्हापासून ते आजतागायत माझा त्या जागेवर ताबा वहिवाट आहे. मात्र एप्रिल 2021 पासून भागुबाई कलाटे यांचा मुलगा दिलीप सोपान कलाटे व सून आशा दिलीप कलाटे व त्यांचे दोन्ही मुले असे चौघे जण व इतर पाच सहा जण गाडीत येतात मला माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देतात ‘जागा खाली करा या जागेवर आमचा ताबा आहे’ असे वारंवार बोलून मानसिक त्रास देत आहेत.
या त्रासाला कंटाळून 06 एप्रिल 2021 रोजी मी पोलिस कमिश्नर यांना तक्रारी अर्ज दिला. याचाच राग मनात धरून संगणमताने मी घरात नसताना दिनांक 13 जून 2021 रोजी आशा दिलीप कलाटे आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी माझ्या कुटुंबावर हल्ला करत जातीवाचक शिवीगाळ केली. ‘मुसलमानानो तुमची जागा इथे नाही तुम्ही पाकिस्तानात रहायला जा’ असे म्हणत अंगावर हत्यारा सहित झडप घातली त्यात माझ्या मुलाला व पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला गेला.मुलाच्या अंगाला चावा घेतला व दगडाने व हत्याराने दांडगी लाकड्यांनी मारहाण केली.
त्यात त्याने स्वतःला व त्याच्या आईला वाचवण्याची धडपड करत असताना दिलीप कलाटे व त्यांच्या दोन्ही मुलांना ढकलून जीव वाचवून वाकड पोलिस ठाणे गाठून तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याची तक्रार घेतली नाही. आशा दिलीप कलाटे आणि त्यांच्या घरच्यांपासून माझ्या कुटुंबाला धोका आहे.त्यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास आमच्या जीवाची फिकीर कोण करणार असे देखील या तक्रारीत म्हटले आहे. सदरील घटनेविषयी वाकड पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गिरणार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेण्यास टाळाटाळ केली.