सोशलमिडीयावर कोयता घेऊन स्टेट्स टाकणा-या रावण टोळीच्या सदस्याला निगडी पोलिसांनी केली अटक
निगडी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांकडून आपल्या प्रतिस्पर्धीला ‘खुन्नस’देण्यासाठी सोशलमिडीयाचा सर्रास वापर केला जात आहे. सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या गुन्हेगारांवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या सायबर विभाग आणि गुंडा विरोधी पथकाचे बारीक लक्ष आहे . या दोन विभागाच्या निदर्शनास एखादा प्रकार आल्यास संबंधित भाईची भाईगिरी उतरवण्याचा पोलिसांनी प्रण केला आहे. अशाच एका भाईला कोयता घेऊन स्टेट्स टाकणे भोवले आहे. त्याला निगडी पोलिसांनी अटक केली आहे.
स्वप्नील उर्फ युवराज सुरेश गायकवाड ( वय 23 , रा . उरुळी कांचन , ता . हवेली ) असे पोस्ट शेअर करणाऱ्या तरुणाचे नाव आहे त्याला निगडी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्नील उर्फ युवराज गायकवाड याने इट्राग्राम या सोशलमिडीयावर हातात तलवार घेऊन गुन्हेगारीचे उदात्तीकरण केले. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला असता पोलिसांनी त्याला निगडीतील अंकुश चौक येथून कोयत्यासह ताब्यात घेतले . आरोपी गायकवाड याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी स्वप्नील उर्फ युवराज गायकवाड हा रावण साम्राज्य टोळीशी संबंधित असल्याचे म्हटले जाते . तो रावण साम्राज्य टोळीच्या नावाचा वापर करून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे . मात्र , या गुन्हेगाराला सोशल मीडियावरील पोस्ट चांगलीच महागात पडली आहे . पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत.