खाजगी शाळांना पालिकेचा दणका ;आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या शाळांना नोटीस
पिंपरी (वास्तव संघर्ष) : एकिकडे सर्वशिक्षा अभियान राबविण्यात शासकीय स्तरावर निर्णय घेतले जातात तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम पिंपरी चिंचवड शहरातील काही खासगी शाळा करत आहेत. शिक्षण हक्क कायद्यातंर्गत(आरटीई) राखीव असलेल्या 25 टक्के जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक असताना काही खासगी शाळा प्रवेश नाकारत असल्याच्या तक्रारी महापालिका शिक्षण विभागाकडे आल्या होत्या . अशा खासगी शाळाना पालिकेने दणका दिला आहे. शहरातील एकूण 15 खासगी शाळांना नोटीस पाठविल्या आहेत .
राज्य सरकारकडून प्रतिपूर्तीची रक्कम मिळालेली नाही . त्यामुळे काही शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास टाळाटाळ करीत असल्याची स्थिती आहे . ज्या शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नाही , अशा शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटीस मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने म्हटले आहे .तसेच मागील तीन वर्षांपासून शाळांना प्रतिपूर्तीची रक्कम मिळालेली नाही .मात्र शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारता येत नाही .
त्यामुळे ज्या शाळाची आरटीई अंतर्गत नोंदणी झाली आहे . त्या शाळांनी प्रवेशाची मुदत असेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत , असे शिक्षण विभागाने सांगितले आहे . शिक्षण विभागाने या पूर्वीही काही शाळांना नोटीस बजावल्या होत्या . आता पुन्हा या शाळांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत . प्रतिपूर्तीची रक्कम न मिळाल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना कोणत्याही शाळेने प्रवेश नाकारू नये . प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर शिक्षण हक्क कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल , असा इशाराही देण्यात आला आहे.