पिंपरी चिंचवड शहरात ‘भाई’ चा मोठा फ्लेक्स लावणं भोवलं ;पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड शहरात ‘भाईगिरी’ सोशलमिडीयावर ॲक्टीव झालेली दिसत आहे. सोशलमिडीया पाठोपाठ आता हे भाई दिवसाढवळ्या बॅनरवर देखील झळकत आहेत. गेल्या वेळी सोशलमिडीयावर कोयता घेऊन व्हीडिओ बनवणा-या रावण साम्राज्य टोळीच्या तेरा सदस्यांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली होती. आता याच टोळीच्या एका सदस्याने पिंपरी चिंचवड शहरातील कुख्यात गुंड रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधव याच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावल्याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
ही घटना गुरुवारी ( दि . 22 ) रात्री नऊ वाजता भोंडवे कॉर्नर , रावेत येथे घडली. पिंपरी चिंचवड परिसरात अशा प्रकारे भाईगिरी करणा-यांची वाढती संख्या पोलिसांसाठी डोके दुःखी ठरू लागल्याने, दहशत पसरविणाऱ्या भाईंना पकडण्यासाठी धडक मोहीम राबविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे आणि त्यानुसार पोलिस कारवाई देखील करत आहेत.
अविष्कार राजू साळुखे ( वय 30 , रा . अण्णाभाऊ साठे वसाहत , निगडी ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे .
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल संजय आंधळे यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पिंपरी – चिंचवड शहरातील कुख्यात रावण साम्राज्य टोळीचा म्होरक्या मयत अनिकेत जाधव याचा शुक्रवारी ( दि . 23 ) वाढदिवस होता . यानिमित्त आरोपी अविष्कार साळुखे याने गुरुवारी रात्री नऊ वाजता भोंडवे कॉर्नर , रावेत येथे अनिकेत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे मोठे फ्लेक्स बॅनर लावले होते . याप्रकरणी शहराचे विद्रुपीकरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत .