बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

फुटपाथवर पार्किंग केलेल्या वाहनांवर पालिकेचे पथक करणार कारवाई

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पदपथ तसेच सायकल ट्रॅकवर अनाधिकृतपणे अथवा अतिक्रमण करून पार्किंग केलेल्या वाहनांवर व अतिक्रमणावर महानगरपालिका अतिक्रमण पथक व धडक पथकाने कारवाई करावी, असे आदेश महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी दिले.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित केला आहे.आदेशात नमूद केले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील पदपथ व सायकल ट्रॅक नागरिकांना वापर करणेकरीता उपलब्ध करून देणेबाबत महानगरपालिकेची जबाबदारी आहे. तथापि शहरातील बहुतांश पदपथ व सायकल ट्रॅकवर नागरिक अनाधिकृतपणे/अतिक्रमण करून वाहने पार्क करीत असल्याने नागरिकांना पदपथावर चालतांना व सायकल ट्रॅकवर सायकल चालवतांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पदपथावर व सायकल ट्रॅकवर अनाधिकृतपणे/अतिक्रमण करून पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करणे व अतिक्रमण निष्काशीत करणे आवश्यक आहे.

सार्वजनिक रस्त्यांच्या किंवा विशिष्ट सार्वजनिक रस्त्यांच्या बाबतीत अशा रस्त्याच्या बाजूस किंवा रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांमुळे पादचाऱ्यांना धोका पोहोचण्याचा किंवा अडथळा होण्याचा संभव आहे असे वाटेल अशा सर्व वाहनांवर महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 208 ती वाहने ओढून नेण्याची किंवा त्यांचे स्थलांतर करणेस आणि कलम 243 -अ (1) नुसार अशी वाहने महापालिका आयुक्तास योग्य वाटतील अशा जागी उभी करून ठेवता येतील. त्यासंबधातील फी किंवा शुल्क आकारण्यास आयुक्तास अधिकार प्राप्त आहेत. तसेच महापालिका अधिनियम कलम 392 (1) अन्वये वरील कलम 243 -अ (1) व कलम 208 मधील तरतुदींचे उल्लंघन करील किंवा अनुपालन करण्यात कसूर करील त्यास अशा प्रत्येक अपराधाबद्दल दंडाची शिक्षा करण्यास महापालिका आयुक्त सक्षम आहेत. असे आदेशात नमूद करण्यात आले आहे

Share this: