बातम्या

आता या वेळेपर्यंत सुरू राहतील पिंपरी चिंचवड शहरातील दुकाने

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड शहरातील निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे . त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरात अत्यावश्यक सेवेतील दुकाने , आस्थापना सर्व दिवस पूर्ण वेळ सुरू राहतील . तर अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने आणि आस्थापना रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे . याबाबतचे आदेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत .

आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने व आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस पूर्णवेळ सुरू राहतील . अत्यावश्यक सेवेची दुकाने व आस्थापना वगळता इतर दुकाने आणि आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील . त्या दुकानांची साप्ताहिक सुट्टी वगळून शॉपिंग मॉल लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्या नागरिकांसाठी रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील . नागरिकांनी दोन डोस पूर्ण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे अनिवार्य आहे.शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या कामगार व इतर व्यक्तींची रॅपिड चाचणी प्रत्येक पंधरा दिवसांनी करणे बंधनकारक आहे . कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी मॉल व्यवस्थापनाची राहील .

रेस्टॉरंट , बार , फूड कोर्ट हे आठवड्यातील सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील . घरपोच सेवा रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू राहील . सर्व रेस्टॉरंट , बार , फूड कोर्ट इत्यादींना दर्शनी भागावर पिंपरी – चिंचवड महापालिकेने दिलेल्या सूचनांचे स्टिकर लावणे बंधनकारक असेल . जलतरण तलाव व निकट संपर्कात येणारे सर्व क्रीडाप्रकार वगळून अन्य इनडोअर व आऊटडोअर खेळ हे नियमितपणे सुरू राहतील .

सार्वजनिक उद्याने आठवड्यातील सर्व दिवस नियमित वेळेत सुरू ठेवता येतील . पिंपरी – चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक , माध्यमिक शाळा , महाविद्यालये , शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णता बंद राहतील . मात्र ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील . स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र , क्लासेस हे सर्व दिवस रात्री आठ वाजेपर्यंत आसक क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील . या ठिकाणी प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांचे लसीकरण किमान एक डोस अनिवार्य आहे . व्यायाम शाळा , सलून , ब्यूटी पार्लर , स्पा , वेलनेस सेंटर आसनक्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने पूर्वनियोजित वेळेनुसार रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील . या ठिकाणी वातानुकूलित एसी सुविधा वापरता येणार नाही . सर्व प्रकारची धार्मिक स्थळे राज्य शासनाच्या पुढील आदेशापर्यंत बंद राहतील . पिंपरी – चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये रात्री अकरा वाजेपर्यंत जमावबंदी असेल व रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत अत्यावश्यक कारण वगळता संचारबंदी लागू राहील .

Share this: