बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

तृतीयपंथीयांना समाजाचा एक घटक समजून सन्मान दिला पाहिजे ; महापौर उषा ढोरे

पिंपरी (वास्तव संघर्ष) : तृतीयपंथीयांना कोणताही रोजगार मिळू शकत नाही. त्यामुळे त्यांना नाईलाजास्तव टाळ्या वाजवत रस्त्यावर भीक मागून जगावे लागते. त्यांना समाजात सन्मान मिळण्यासाठी तसेच, स्वत:च्या पायावर उभे राहता यावे म्हणून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम स्वागतार्ह आहे. त्या घटकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून समाजाचा एक घटक म्हणून सन्मानाने पाहिले पाहिजे, असे मत  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी मंगळवारी (दि.14) व्यक्त केले.

तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदण्यासाठी फोर फॉक्स प्रॉडक्शनच्या वतीने ‘अर्धनारी नटेश्वर’ आणि ‘मिस अ‍ॅण्ड मिसेस व्हिजन महाराष्ट्र प्रेजेंट’ कार्यक्रमाचे पुण्यात 23 सप्टेंबरला आयोजन केले आहे. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत महापौर उषा ढोरे बोलत होत्या. त्यांच्या हस्ते फॅशन शोमधील विजेत्यांसाठी असलेल्या आकर्षक क्रॉऊनचे अनावरण करण्यात आले.

या वेळी फोर फॉक्स प्रॉडक्शनचे संस्थापक संचालक माहीर करंजकर, के. सी. चौधरी, महेश चरवड, शर्वरी गावंडे, लेखिका सोनल गोडबोले, सहारा प्रॉडक्शन हाऊसचे संस्थापक संचालक डॉ. राजेंद्र भवाळकर, अखिल भारतीय जाणीव संघटनेचे आनंद पायाळ, पूनम मिश्रा, गौरव मण्डल, रवी कदम, पुणेरी प्राईड फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रेरणा वाघेला, बिईंग वूमनच्या संचालिका रोहिणी वांजपे, शुभांगी नांदूरकर व प्रसिद्ध अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, अभिनेत्री गौरी कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.

महापौर म्हणाल्या की, तृतीयपंथीयांना टाळी वाजवत भीक मागणे किंवा रात्रीच्या वेळी रस्त्यांवर उभे राहू लागू नये म्हणून हा उपक्रम राबविला जात आहे. त्यास महापालिकेच्या वतीने सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. तृतीयपंथीयांना वेगळे न समजता, त्यांना सन्मानाची वागणूक दिली गेली पाहिजे. त्या घटकांसाठी महापालिकेच्या कल्याणकारी योजना आहेत. त्या त्यांच्यापर्यंत पोहचविल्या जात आहेत. तसेच, त्या वर्गासाठी अर्थसंकल्पात भरीत तरतूद केली जाईल, अशी ग्वाही महापौर उषा ढोरे यांनी दिली.

Share this: