डीलक्स चौकातील कापड दुकानात राडा घालणाऱ्या तीन आरोपींवर गुन्हा दाखल
पिंपरी (वास्तव संघर्ष) : डीलक्स चौक येथील मिस्टर मॅड या दुकानात जाऊन तोडफोड करून राडा घालणाऱ्या तीन आरोपींवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही घटना सोमवारी ( दि . 13 ) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पिंपरीतील डीलक्स चौक येथे मिस्टर मॅड या कापड दुकानात घडली .
कासीम अस्लम शेख ( वय 26 , रा . पिंपरी ) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
किरण ( वय – अंदाजे 22 , पूर्ण नाव पत्ता माहिती नाही ) , तुषार ( वय – अंदाजे 20 , रा . बौद्धनगर , पिंपरी ) , सुमित ( वय – अंदाजे 24 , रा . बौद्धनगर , पिंपरी ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पिंपरीतील डीलक्स चौक येथे मिस्टर मॅड हे कापड दुकान आहे . या दुकानात फिर्यादी कासिम हे काम करतात . सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास तीन मुले हातात लोखंडी कोयता घेऊन आले होते . ‘ आम्हाला पैसे द्या नाहीतर येथे धंदा करू देणार नाही ‘ अशी धमकी दिली तसेच चॉपर दाखवत पैशांची मागणी केली . तीथे काम करत असलेल्या मुलांनी प्रतिकार केला असता दोन कामगारांवर कोयत्याने वार केले . तसेच चॉपरने फिर्यादी कासिम यांच्यावर वार केले . या हल्ल्यात फिर्यादीसह अन्य एक कामगार जखमी झाला आहे. आरोपींनी दुकानातील डिस्प्ले काच काउंटरवर चॉपरने वार करून दुकानाचे नुकसान केले आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी करित आहेत.