निगडीतील ओटास्कीम खून प्रकरणातील दोन आरोपींना अटक
निगडी (वास्तव संघर्ष) : निगडीतील ओटास्कीम येथे एका व्यक्तीचा भांडण सोडविल्याच्या रागातून खून झाला होता . ही घटना सोमवारी ( दि . 20 ) मध्यरात्री घडली.या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी एका आरोपीला त्याच्या घरातून अटक केली . त्याच्यासह अन्य एका आरोपीला अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
संपत भीमराव गायकवाड ( वय 45 , रा . अण्णाभाऊ साठे वसाहत चाळ , ओटास्कीम , निगडी ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे .
संतोष यादव अडागळे ( वय 39 ) , वैभव उर्फ बिच्या संतोष अडागळे ( वय 19 , दोघे रा.अण्णाभाऊ साठेनगर चाळ नंबर दोन , ओटास्कीम , निगडी ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत .
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार , ओटास्कीम परिसरात गणपती मिरवणूक सुरू असताना दोन गटात भांडण झाले . ते संपत यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला . त्या कारणावरून आरोपींनी गायकवाड यांच्या घरावर दगड मारले . गायकवाड यांनी आरोपींच्या घरासमोर जाऊन तुमची आमच्या घरावर दगड का मारले ‘ असा जाब विचारला . या कारणावरून आरोपी वैभव याने सिमेंटच्या गट्टने गायकवाड यांच्या कपाळावर जोरात मारले तर अन्य आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गायकवाड यांना ठार मारले . त्यानंतर आरोपी संतोष याने संपत यांचे जमिनीवर पडलेले रक्त पाणी टाकून धुवून पुरावा नष्ट केला .
पोलीस आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना माहिती मिळाली की , आरोपी संतोष हा त्याच्या घरात लपून बसला आहे . पोलिसांनी सुरुवातीला त्याच्या घराचा दरवाजा थोपटला . परंतु आतून काहीच प्रतिसाद आला नाही . पोलिसांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला परंतु दरवाजा देखील तोडता आला नाही . त्यामुळे पोलिसांनी थेट त्याच्या घराच्या छताचे पत्रे उचकटून घरात प्रवेश केला . घरात संतोषचा शोध घेतला असता तो घरातील पलंगाखाली लपून बसला पोलिसांनी संतोषला अटक केली .त्याच्या मुलाला देखील पोलिसांनी एका घरात लपून बसल्याचे समजल्याने त्या घरातून अटक केली आहे . यासह एका अल्पवयीन मुलाला त्याच्या मामाच्या घरुन , एका अल्पवयीन मुलाला परराज्यात पळून जात असताना ताब्यात घेतले . एकूण तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.