बातम्यामहाराष्ट्र

भगतसिंह कोश्यारी पदमुक्त;रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

महाराष्ट्र (वास्तव संघर्ष): महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त करत आपला राजीनामा दिल्यानंतर आज अखेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. कोश्यारी यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशभरातील 13 राज्यांमध्ये आज फेरबदल झाले असून झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहणारे रमेश बैस हे लवकरच महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची धुरा सांभाळणार आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द प्रचंड वादळी ठरली. महाविकास आघाडीचं सरकार असताना कोश्यारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून लिहिलेल्या वादग्रस्त पत्राचीही मोठी चर्चा झाली होती. तसंच राज्यपाल नियुक्त आमदारांवरून कोश्यारी यांचे महाविकास आघाडीसोबत प्रचंड मतभेद झाल्याचं समोर आलं होतं. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यातून कोश्यारी यांनी वाद ओढावून घेतला होता. या सगळ्या घडामोडींमुळे भगतसिंह कोश्यारी हे राज्यपालपदाच्या प्रतिष्ठेला धक्का लावत असल्याचा आरोप होत होता. परिणामी राज्य आणि केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपचीही राजकीय कोंडी झाली होती. त्यामुळे कोश्यारी यांची गच्छंती अटळ मानली जात होती. आता त्यांच्या जागी राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानंतर रमेश बैस यांच्यासमोर सत्ताधारी आणि विरोधकांना सोबत घेत राज्याच्या राजकीय गाडा सुरळीत ठेवण्याचं प्रमुख आव्हान असणार आहे.

Share this: