क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

बनावट लग्नातील ‘नवरदेव’ पिंपरी चिंचवड पोलीसांनी केला गजाआड;तब्बल शंभर महिला मुलींना लग्नासाठी फसवले

पिंपरी (वास्तव संघर्ष) : एका प्रसिद्ध लग्न जमवणा-या वेबसाईटवर आकर्षक प्रोफाईल बनवत देशभरातील विवाहोच्छुक तरुणींची फसवणूक करणाऱ्या आणि बनावट नवरदेव बनून तब्बल शंभर महिला मुलींना लग्नासाठी फसवणा-या भामट्याला पिंपरी चिंचवड पोलीसांनी अटक केली आहे.

प्रेमराज थेवराज डिकृज(मुळ राहणार तामिळनाडू चेन्नई) असे आरोपीचे नाव आहे त्याला निगडी पोलिसांनी अटक केली आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रेमराज थेवराजने तब्बल शंभर महिला मुलींना लग्नासाठी फसवले आहे. दोन-तीन महिने तो चिंचवडमधील एका उच्चशिक्षित तरुणीशी गप्पा मारत होता. प्रेमाच्या आणाभाका घेत आरोपींने तरूणींशी ओळख वाढवत तिचा विश्वास संपादन करून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लाखो रुपये उकळले. मी रेल्वे काँट्रॅक्टर आहे. लॉकडाऊन असल्याने कामगारांचे पैसे दिले नाहीतर रेल्वे कंत्राट रद्द होईल , असे त्याने खोटे बोलून तरूणीला पैशाची मागणी केली. त्याच्या थापांना भुलून तरुणीने आपल्या भावी नवरदेवाच्या बँक खात्यावर तब्बल 11 लाख 4 हजार 500 रुपये पाठवले. एवढ्यावरच न थांबता त्याने तिच्याशी लग्न करण्याचा बनाव रचला.लग्नासाठी प्रेमराजने फिर्यादी तरुणीला चेन्नईला बोलावले. त्यामुळे तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत चेन्नईला गेली. तिथे त्याने आपला मित्र रजिस्टर ऑफिसमध्ये असल्याचे भासवून तरुणीसोबत नोंदणी पद्धतीने लग्न केल्याचा बनाव रचला. त्यानंतर तरुणी पुण्याला परत आली.

त्यानंतर दहा ते बारा दिवसांनी आरोपीने तिला लग्नाचे खोटे प्रमाणपत्र पाठवले आणि 80 लाख रुपयांचे ‘पर्सनल लोन ‘काढून देण्याची मागणीही केली. तिने नकार देताच आरोपीने तिच्या आई-वडिलांच्या जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी तरूणीच्या लक्षात आली आणि तिने निगडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. याचा तपास करताना निगडी पोलिसांना आरोपी प्रेमराज थेवराज याला विमाननगर येथून अटक केली आहे. आरोपीने तब्बल शंभरहून अधिक महिला मुलींना फसवल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपीकडून विविध कंपन्यांचे सात मोबाईल, तेरा सिमकार्ड, चार एटीएम कार्ड जप्त करण्यात आली आहेत. त्याने शंभरहून अधिक महिलांना संपर्क साधला असून अनेक जणींशी साखरपुड्याचे नाटक करत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचा आरोप आहे.

Share this: