बातम्या

पिंपरी-चिंचवड भाजपाचा किल्ला अभेद्य; ‘पीएमआरडीए’च्या निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी

पिंपरी(वास्तव संघर्ष) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या नियोजन समितीच्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने आपला किल्ला अभेद्य ठेवला. भाजपाचे सर्व सहा उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपाचामध्ये बंडखोरी होईल आणि महाविकास आघाडीला फायदा होईल, अशा वल्गना करणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अक्षरश: तोंडावर पडली आहे.

नियोजन समितीच्या ३० जागांसाठी बुधवारी (दि.10) मतदान झाले होते. पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 95 टक्के मतदान झाले. भाजपाच्या सर्व 75 नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यातील 22जागा पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत, एक नगरपालिका क्षेत्रासाठी, तर सात जागा ग्रामपंचायत हद्दीकरीता आहेत. पुणे महापालिका हद्दीत एका काँग्रेस उमेदवारामुळे मतदान घ्यावे लागले. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील 9 जागांसाठी भाजपाचे सहा उमेदवार रिंगणात होते. सभागृहनेते नामदेव ढाके, नगरसेवक चंद्रकांत नखाते, संदीप कस्पटे, निर्मला गायकवाड, वसंत बोराटे, जयश्री गावडे यांनी बाजी मारली आहे.

महापालिका निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आली असताना सत्ताधारी भाजपामधील सुमारे 25 ते 30 नाराज नगरसेवक बाहेर पडणार आहेत, अशी चर्चा पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या निवडणुकीत भाजपातील नाराज बंडखोरी करीत विरोधी पक्षाच्या उमेदवारांना मतदान करतील, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, सर्व अंदाज फोल ठरवीत भाजपाचे दोन्ही नेते शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिकेतील वर्चस्व कायम ठेवले आहे.

आमदार महेश लांडगे यांच्या ‘कमिटमेंट’चे वर्तुळ पूर्ण…
भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी 2017 मध्ये महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर आपल्या सर्व समर्थकांना विविध पदांवर संधी दिली आहे. मात्र, नगरसेवक वसंत बोराटे आणि नगरसेविका निर्मला गायकवाड यांना महत्त्वाच्या पद दिले नव्हते. त्यामुळे बोराटे व गायकवाड नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी शेवटच्या टप्प्यात आपल्या दोन्ही समर्थक नगरसेवकांना थेट पुणे जिल्ह्यासाठी काम करणाऱ्या नियोजन समितीवर काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली. त्यामुळे आमदार लांडगे यांनी आपल्या राजकीय ‘कमिटमेंट’चे वर्तुळ पूर्ण केले, अशा भावना लांडगे समर्थकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

Share this: