बातम्या

पिंपरी चिंचवडमधील निवडणूकीच्या प्रभाग रचनेबाबत सहा दिवसांची मुदतवाढ

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी-चिंचवड शहराची गेल्या दहा वर्षात झालेली लोकसंख्या वाढ , विकासकामांमुळे झालेला बदल यांमुळे नव्याने प्रभाग रचना करताना निवडणूक विभागाची दमछाक होत आहे . निवडणूक गट ( ब्लॉक ) फोडण्यास निवडणूक आयोगाची मनाई असल्याने प्रभाग रचनेत मोठा अडसर निर्माण झाला आहे. प्रभाग रचनेचे केवळ 30 ते 35 टक्के काम पूर्ण झाले . मुदतीत काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे महापालिकेने प्रभाग रचनेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे मुदतवाढ मागितली होती . त्यानुसार आयोगाने 6 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

प्रभाग रचनेचे काम पूर्ण करण्यासाठी आणखी 8 ते 10 दिवस लागतील . महापालिका प्रशासनाने प्रभाग रचनेचा आराखडा सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत राज्य निवडणूक आयोगाकडे मागितली होती . पण , निवडणूक आयोगाने 6 दिवसांची म्हणजेच 6 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ दिली . त्यामुळे सहा दिवसात प्रशासनाला प्रभाग रचनेचा आराखडा तयार करुन निवडणूक आयोगाला सादर करावा लागेल.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 25 ऑगस्ट 2021 रोजी एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते . त्यानंतर राज्य मुंबई वगळता 17 महापालिकांच्या निवडणुका तीनसदस्यीय पॅनल पद्धतीने घेण्याचा निर्णय 30 सप्टेंबर रोजी घेतला. त्यानंतर राज्य सरकारने राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महापालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय 27 ऑक्टोबर रोजी घेतला. त्यानुसार नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश 3 नोव्हेंबर 21 रोजी महापालिकेला दिले . प्रभाग रचनेचा कच्चा प्रारुप आराखडा 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले होते. माञ या मुदतीत महापालिका प्रशासन आराखडा तयार करु शकले नाही.त्यामुळे मुदतवाढ देण्यात आली आहे.

Share this: