बातम्या

अजित पवारांनी आमदार लक्ष्मण जगतापांची रूग्णालयात जाऊन केली विचारपूस 

पिंपरी(वास्तव संघर्ष) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवारी) बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. रुग्णालयातील डॉक्टरांकडून सर्व माहिती घेतली. आमदार जगताप यांचे बंधू विजय जगताप, शंकर जगताप यांच्याशी चर्चा करून धीर दिला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज केले जाणार होते. पण, आपले एकेकाळचे खंदे समर्थक व आताचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व उद्घाटन कार्यक्रम रद्द केले. कार्यक्रम रद्द करून अजित पवार यांनी बाणेर येथील रुग्णालयात जाऊन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. भाऊंच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून माहिती घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर योगेश बहल यावेळी उपस्थित होते.आमदार लक्ष्मण जगताप आणि अजित पवार यांनी अनेक वर्षे एकत्र काम केले. त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. जगताप यांनी पक्ष बदलला तरी त्यांचे संबंध कायम आहेत. आपला एकेकाळचा खंदा समर्थक आजारी असल्याचे समजताच अजितदादांनी सर्व कार्यक्रम रद्द करून थेट रुग्णालयात जाऊन जगताप यांची भेट घेतली.

Share this: