योगेश जगताप खून प्रकरणातील आरोपींनी केली पोलिसांवर गोळीबार
पिंपरी(वास्तव संघर्ष) : सांगवी, पिंपळे गुरव मधील काटेपुरम चौकात भर दिवसा एका सराईत गुन्हेगाराचा गोळ्या घालून खून करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपींना पकडायला गेलेल्या पिंपरी चिंचवडच्या पोलीस पथकावर आरोपींनी गोळीबार केला. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. तर स्वक्षणार्थ पोलिसांनाही आरोपींच्या दिशेने फायरिंग केले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
योगेश रवींद्र जगताप (36, रा. पिंपळे गुरव) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तर गणेश हनुमंत मोटे, अश्विन आनंदराव चव्हाण, गणेश बाजीराव ढमाले, अभिजित बाजीराव ढमाले, प्रथमेश लोंढे, गणेश उर्फ मोनू सपकाळ, अक्षय केंगले, निखिल उर्फ डोक्या अशोक गाडुते, राजन उर्फ बबलू रवी नायर, महेश तुकाराम माने, निलेश मुरलीधर इयर (सर्व रा. सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी आपसात संगनमत करून कट रचला. परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून योगेश जगताप याच्यावर गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झालेल्या योगेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या गुन्ह्यातील आरोपी चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरवंडी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तत्काळ पोलिसांची चार पथके रवाना झाली.पोलिसांना पाहताच आरोपीनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. यामध्ये एक पोलीस जखमी झाला. पोलिसांनीही आरोपींच्या दिशेने फायरिंग केले.