भिमा कोरेगाव पर्यटन स्थळापेक्षा शुरवीरांची भुमी म्हणून ओळखली जावी : मंत्री नितीन राऊत
पिंपरी (वास्तव संघर्ष ):ज्या पाचशे शुरवीरांनी प्राणपणाने झुंज देत पेशव्यांचा पराभव केला. त्यांना या शुरभूमीत येऊन मानवंदना देताना अभिवादन करताना मला आनंद होत आहे. हि भुमी शूरवीरांची, शूर सैनिकांची, शूर मावळ्यांची आहे. हि भुमी पर्यटन स्थळापेक्षा शुरवीरांची भुमी म्हणून ओळखली जावी. राज्य शासनाने कोरेगाव भिमा परिसरातील या जागेच्या विकासाठी शंभर कोटी रुपये मंजूर केले आहे. आता पुढचे काम लवकर सुरु व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. मागील काळात या ठिकाणी झालेल्या अभिवादन कार्यक्रमात झालेल्या दगडफेकीच्या घटनेबाबत आंबेडकरी बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबतही लवकरच मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊ असे प्रतिपादन वीजमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
1 जानेवारी शौर्यदिनानिमित्त कोरेगाव भिमा येथील विजयीस्तंभास डॉ. नितीन राऊत अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना डॉ. राऊत बोलत होते. यावेळी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे अनुसूचीत जाती विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोठिया, महाराष्ट्र अनुसूचीत जाती आयोगाचे माजी अध्यक्ष न्यायमुर्ती सी. एल. थूल, कॉंग्रेसचे अनुसूचीत जाती विभाग महाराष्ट्र प्रभारी मनोज बागडी, कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अनुसूचीत जाती विभागाचे कार्याध्यक्ष गौतम आरकडे, प्रदेश उपाध्यक्ष सुजीत यादव, पुणे शहर अध्यक्ष शिलार रतनगिरी, पुणे शहर कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे आदी उपस्थित होते.
अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे अनुसूचीत जाती विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोठिया म्हणाले की, देशातील मनुवादाला आंबेडकरवाद हाच पर्याय ठरु शकतो. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या आदेशाने मी सांगू इच्छितो की, कॉंग्रेस पक्ष नेहमीच देशातील बहुजनांच्या हक्कासाठी लढला आणि लढत राहिल.
यानंतर डॉ. नितीन राऊत आणि राजेश लिलोठिया यांनी वढु बुध्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळास भेट देऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच गोपाळ गोविंद गायकवाड यांच्याही समाधीला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व वंशजांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. तसेच वढु बुध्रुक येथील वीज व्यवस्था आणखी चांगली करण्याचे संबंधित अधिका-यांना आदेश दिले. पुणे – नगर रस्त्यावरील लोणीकंद सब स्टेशन येथे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने नागरीकांसाठी खिचडी व पाणी वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.