बातम्या

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे दुःखद निधन


पिंपरी (वास्तव संघर्ष): सलग तीन वेळा चिंचवड विधानसभेचे नेतृत्व केलेले पिंपरी चिंचवड शहर भाजपचे माजी अध्यक्ष लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे.
आज मंगळवारी (दि. 3)जानेवारी रोजी उपचारादरम्यान  रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द १९८६ मध्ये सुरू झाली होती. त्यावेळी ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आले. २००६ पर्यंत सलग २१ वर्षे ते नगरसेवक होते. १९९३ मध्ये त्यांनी महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले. त्यानंतर २००० मध्ये ते पिंपरी-चिंचवडचे महापौर झाले.२००४ मध्ये ते पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. २००९ मध्ये विधानसभेच्या मैदानात अपक्ष उतरून चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून ते निवडून आले. २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत ते प्रचंड मताधिक्याने निवडून आले. २०१९ मध्येही त्यांनी आमदारकीच्या निवडणुकीत चौथ्यांदा दणक्यात विजय मिळवला. भाजपच्या तिकीटावर सलग दुसऱ्यांदा ते निवडून आले होते.

२०१९ च्या निवडणुकीतील विजयानंतर त्यांना दुर्धर आजाराने ग्रासले होते. तरीही त्यांनी कोरोना संकट काळात स्वतःपेक्षा नागरिकांना मदत करण्यात धन्यता मानली होती. कोरोना काळात त्यांनी गोरगरीब व गरजू नागरिकांना त्यांनी भरपूर मदत केली. उदरनिर्वाह असो की हॉस्पिटल असो त्यांनी नागरिकांना मदत करून माणुसकी जपली. गेल्या वर्षभरापासून त्यांचा सार्वजनिक जीवनातला वावर अतिशय कमी झाला होता. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथूनही ते नागरिकांची कामे करत होते. शहरविकासासाठी निगडीत प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकार, महापालिका, जिल्हाधिकारी व इतर शासकीय कार्यालयासोबत सातत्याने पत्रव्यवहार करत होते. पण आजारासोबत असलेली त्यांची झुंज मंगळवारी अखेर अपयशी ठरली.

Share this: