उत्कर्ष आनंद शिंदे वंचित आघाडीकडून पिंपरी विधानसभा निवडणुक लढणार
पिंपरी (वास्तव संघर्ष) सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचे पुञ डॉ.उत्कर्ष शिंदे यांना शिवसेनाच नाही,तर भाजप, राष्ट्रवादी आणि एमआयएम वंचित बहुजन आघाडी तर्फे विधानसभा निवडणुक लढण्याचे आमंत्रण दिले आहे. मात्र, ते एमआयएम वंचिततर्फे पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी या राखीव मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे. खुद्द डॉ. उत्कर्ष यांनीच त्याला दुजोरा वास्तव संघर्ष न्यूज प्रतिनिधीशी बोलताना दिला.
डॉ. उत्कर्ष यांना शिवसेनेची ऑफर ही गावाकडे (मोहोळ) लढण्याची आहे.तर, राष्ट्रवादीने त्यांना पिंपरीतून लढण्याची मुभा दिली आहे. ते पिंपरी मतदारसंघातच राहत असून येथेच त्यांचा दवाखाना,मित्र, हितचिंतक अधिक आहेत. त्यामुळे पिंपरीतून लढण्यास आपले प्राधान्य राहणार असल्याचे डॉ. उत्कर्ष यांनी सांगितले.भाजपनेही ही ऑफर दिली होती. मात्र, त्यांची विचारसरणी मान्य नसल्याने त्यांचा विचारच केला नाही.
त्यामुळे आता माझ्यासमोर वंचित एमआयएम राष्ट्रवादी आणि शिवसेना पर्याय आहेत.निवडणूक लढण्यावर आपण ठाम आहात का? असा प्रश्न त्यांना आम्ही विचारला असता ते म्हणाले मला टिकीट भेटले तर १०० टक्के लढणारच. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. समाजकार्य करण्यासाठी राजकारणात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आठवडापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिंदे पितापूत्रांना ऑफर दिली आहे. शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहूल शेवाळे व डॉ. उत्कर्ष यांचे वडिल आनंद शिंदे हे चांगले मित्र आहेत. त्याातूनच शेवाळेंच्या शिष्टाईतून ठाकरे आणि शिंदेशाहीची भेट झाली. त्यावेळी शिवसेनेत प्रवेश केला,तर डॉ. उत्कर्ष यांना विधानसभेसाठी मोहोळ राखीव मतदारसंघातील उमेदवारी देण्याचे कबूल करण्यात आले. तर आनंद शिंदेना विधानपरिषदेवर घेण्याची ऑफर देण्यात आली. पिंपरीत सध्या शिवसेनेचे आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार आहेत.तर शिंदे यांचे मोहोळ हे गाव आहे आणि तेथेही ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. तर शिरूरला लोकसभेला वापरलेला डॉ. अमोल कोल्हे पॅटर्न विधानसभेला पिंपरीत आजमावयचा राष्ट्रवादीचा प्लॅन आहे. माञ आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू असलेला पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिंदेशाही घराण्याचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे उत्कर्ष शिंदे वंचीत बहुजन आघाडीकडून निवडणुकीत उभे रहावे अशी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून मागणी केली जात आहे.