पिंपरी चिंचवडमध्ये व्यायामशाळेच्या नावाखाली पालिकेला लावला जातोय ‘चुना’
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील तरूणांना ‘पैलवान ‘ बनविण्यासाठी खाजगी चालकांना व्यायामशाळा चालविण्याचा ठेका दिला जातो. मात्र, हा ठेका घेतलेला ठेकेदार पालिकेलाच चुना लावण्यात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.पालिकेने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षाही अधिक शुल्क ही व्यायामशाळा स्विकारत असून असे अनेक गैरप्रकार या व्यायामशाळेत होत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सचिन शिंदे यांनी म्हटले आहे की,पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 86 व्यायाम शाळा आहेत . व्यायामाचे साहित्य नसल्याने त्यातील अर्ध्याहून अधिक व्यायाम शाळा बंद आहेत. मात्र , पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ज्या व्यायामशाळा खाजगी ठेकेदाराला चालविण्यास दिल्या आहेत. त्यामधे गैरप्रकार होत आहेत. या व्यायामशाळेत जादा रक्कम आकारण्याचा सपाटा येथील ठेकेदार करत असून त्यांचा पुरावा देखील माझ्याकडे आहे तसेच या व्यायामशाळेत ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षाही अधिक शुल्क नागरिकांकडून वसूल केले जात आहे . महापालिकेने पंचवीस रुपये डिपॉझिट आणि दहा रुपये महिन्याची फी आकारण्याची परवानगी दिलेली आहे . मात्र , खासगी व्यायामशाळा चालक व्यायामासाठी जाणाऱ्या नागरिकांकडून हजार ते तीन हजार रुपये या दरम्यान शुल्क आकारात आहेत.
तसेच वाढदिवस तसेच इतर कारणांसाठी ही व्यायामशाळेचा उपयोग केला जात आहे . खासगी चालकांकडून महापालिकेच्या जागेवरच अनधिकृत व्यायामशाळा बांधकाम करून त्याचा वापर करण्यात येत आहे. हे प्रकार महापालिका क्रीडा विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही कोणत्या प्रकारची कारवाई केली जात नाही. विशेष म्हणजे या खाजगी ठेकेदाराला करार संपण्यापूर्वीच ठेकेदारी देण्याचा प्रताप पालिकेतील कोणता अधिकारी देत आहे याचीही चौकशी करणे आवश्यक आहे असे सचिन शिंदे यांचे म्हणणे आहे .