पोलिस अधिकारी आणि लोकप्रतिनिधीं मिळून मला ञास देत आहेत ;अरुण पवार
पिंपरी(वास्तव संघर्ष) :आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावाचा गैरवापर करून माजी नगरसेवक शंकर जगताप, विजय जगताप, अमोल उंद्रे, तुषार झेंडे यांनी सांगवी पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकार्यांना हाताशी धरून माझ्यावर खोटे आरोप करून गुन्हे दाखल केले आहेत, असा आरोप मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप उपस्थित होते.
अरुण पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, की आपण गेली 25 वर्ष मराठवाडा जनविकास संघ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वारकरी पालखी सोहळ्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून वारकर्यांची सेवा करण्याचा उपक्रम राबवत आहे. याशिवाय गेली 10 वर्ष वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवीत असून, प्रत्येक वर्षी पाच हजार वृक्ष लावून ते वृक्ष जगविण्यासाठी काम करीत आहोत, असे अनेक सामाजिक उपक्रम राबवीत असताना माजी नगरसेवक शंकर जगताप व त्यांच्या नातेवाईकांनी आपण विकसनास घेतलेली जमीन नावावर करण्यासाठी बोगस स्वाक्षरी, मोजणी, त्याचबरोबर पोलिसांना हाताशी धरून माझे व माझ्या कुटुंबाचे चारित्र्य हनन करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. या लोकांपासून मला व माझ्या कुटुंबाला धोका आहे. त्यामुळे आपण याबाबत राज्य मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली असून, मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्याचबरोबर माझी आर्थिक फसवणूक झाली असल्यामुळे राज्य आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडेही लेखी तक्रार केली असून संरक्षण मागितले आहे.
पुढे बोलताना पवार म्हणाले, या प्रकरणात पोलिसांचा काही संबंध नसतानाही पोलिसांनी हस्तक्षेप करून माझ्यावर वारंवार दबावतंत्र वापरले आहे. या त्रासाला मी व माझे कुटुंब कंटाळले असून, आत्महत्या करून जीवन संपवावे की काय, अशा मनस्थितीत मी व माझे कुटुंब आहे. पोलिसाकडून वारंवार मानव हक्काचे उल्लंघन होत असल्यामुळे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राज्य मानवाधिकार आयोग यांच्याकडे तक्रार केली असून, माझ्याकडच्या कागदपत्रांची तपासणी करून आणि पोलिसांकडे असणार्या कागदपत्रांची तपासणी करून सत्य काय आहे, ते पहावे आणि मला न्याय देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
याबाबत पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त वाकड, राज्याचे गृहमंत्री, गृहसचिव, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग नवी दिल्ली, राज्य मानवाधिकार आयोग मुंबई यांच्याकडे अर्ज करून न्याय देण्याची मागणी केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन तक्रारअर्ज देणार असल्याचेही अरुण पवार यांनी सांगितले.